चार नराधमांचा महिलेवर बलात्कार, दोन वर्षांपासून सुरु होता अत्याचाराचा प्रकार

दौंड : आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याच्या आपल्याला पहायला मिळतात मात्र अजूनही काही ठिकाणी पुरुषी अहंकार आणि नीच पुरुषी मानसिकता आडवी येऊन त्यातील नराधम जागा होतो आणि महिलांना अत्याचाराच्या नरक यातना भोगण्याशिवाय पर्यायच उरत नाही. अशीच एक भयंकर घटना दौंड तालुक्यातील भरतगाव येथे उघडकीस आली असून चार नराधमांनी तब्बल दोन वर्षे या महिलेवर बलात्कार केल्याची चीड आणणारी घटना घडली आहे. या अत्याचाराला कंटाळून शेवटी या पीडितीने मोठे धरिष्ठ दाखवत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बलात्कारी आरोपी विकास पोपट ढमाळ, कुलदिप सुरेश टेमगिरे, संजय राजाराम वाघमोडे आणि अरुण प्रकाश गाडेकर (सर्व रा.भरतगाव ता.दौंड, जि.पुणे) या सर्व आरोपिंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कारी आरोपी हे २०२३ पासुन ते दिनांक २७/०४/२०२५ रोजी रात्री ११:०० वाजेपर्यंत वेळोवेळी भरतगाव (ता. दौंड जि.पुणे) या गावच्या हद्दीत असणाऱ्या घरामध्ये आणि शेतामध्ये पीडित महिलेवर अत्याचार करत राहिले.

यातील मुख्य आरोपी विकास ढमाळ हा पीडितेला धमाकावून इतर आरोपिंसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडत होता. जर पीडिताने या अत्याचाराला विरोध केला तर तिला आरोपी धमकावुन जिवे ठार मारण्याची धमकी देत होता. अखेर या सर्व अत्याचाराला कंटाळलेल्या पीडितेला शाररीक व मानसिक त्रास सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर तिने थेट यवत पोलीस ठाण्यात येऊन वरील चारही नराधम आरोपिंच्या विरोधात फिर्याद दिली.

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी आरोपी विकास पोपट ढमाळ, कुलदिप सुरेश टेमगिरे, संजय राजाराम वाघमोडे आणि अरुण प्रकाश गाडेकर यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माने हे करीत आहेत.