अब्बास शेख
दौंड : तब्बल दोन महिन्यांपूर्वी खोपोडी (ता.दौंड) येथील विहिरीमध्ये प्रतीक्षा प्रशांत धायगुडे या २२ वर्षीयमहिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी प्रतीक्षाचा मृत्यू अपघाताने झाला असावा असे वाटत होते मात्र यवत पोलिसांनी सखोल तपास करत या महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलले असून या महिलेचा मृत्यू अपघाताने नव्हे तर तिचा पती आणि त्याच्या साथीदाराने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील मयत प्रतिक्षा हिचे प्रशांत याच्यासोबत दुसरे लग्न झाले होते. तीचे हे दुसरे लग्न असल्याने तिचा पती आरोपी प्रशांत आप्पासो धायगुडे (रा.बोरी, ता.खंडाळा, जि.सातारा) हा प्रतिक्षा सोबत खुश नव्हता त्यामुळे त्याने आपल्या मित्रासोबत प्रतीक्षाला संपविण्याचे कटकारस्थान रचले. त्याने प्रतीक्षा हीला अगोदर पाडवा सणानिमित्त दापोडी (ता.दौंड) येथील तिच्या माहेरी आणून सोडले आणि दोन दिवसांनी मी तुला भेटायला येतोय असे सांगून मित्रा सोबत येऊन त्याने तिला जेवणासाठी बाहेर जाऊ असे म्हणून सोबत आणलेल्या दुचाकीवरून खोपोडी या ठिकाणी असणाऱ्या शहाजी रुपनवर यांच्या शेतातील विहिरीजवळ घेऊन गेले. यावेळी आरोपिंनी तिला त्या विहिरीत ढकलून दिले त्यावेळी प्रतीक्षा गटांगळ्या खात असताना आरोपिंनी तिच्यावर दगडांचा मारा केला. या निर्दयी हल्ल्यामध्ये प्रतीक्षा हिचा मृत्यू झाला.
हा सर्व प्रकार झाल्यानंतर आरोपी हे त्यांच्या बोरी गावाकडे निघून गेले. प्रतीक्षा नेमकी कुठे आहे आणि तिच्यासोबत काय घडले हे तिच्या घरातील मंडळींना समजत नव्हते त्यामुळे त्यांनी प्रतीक्षा मिसिंग असल्याची फिर्याद दिली. यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या पोलीस स्टाफने शिताफिने तपास सुरु करताच आपण आता पकडले जाणार हे प्रशांत धायगुडे याच्या लक्षात आले आणि कुणाला काही एक न सांगता त्याने स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
हा प्रकार घडल्यानंतरही यवत पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवला आणि मोबाईल लोकेशन, सिडिआर च्या मदतीने प्रशांत सोबत असणारा दुसरा आरोपी सोमनाथ कृष्णा सरक (रा.बोरी, ता.खंडाळा जि.सातारा) याच्यावरही नजर ठेऊन त्यालाही शिताफिने अटक केली. पोलिसांनी आरोपी सोमनाथ सरक याच्याकडे अधिक तपास केला असता आरोपीने संपूर्ण घटनेची माहिती देत खुनाची कबुली दिली. याबाबत यवत पोलीस मारोती इरन्ना मेतलवाड यांनी फिर्याद दिली असून वरील दोन्ही आरोपिंवर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.