महिला पोलीस कर्मचाऱ्यावर दौंड पोलीस स्टेशनमध्येच ‘हल्ला’! सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका महिले विरोधात गुन्हा दाखल

दौंड : दौंड पोलीस स्टेशनमध्ये वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीसास एका महिलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी महिला पोलीस उषा हनुमंत अनारसे यांनी फिर्याद दिली. सुरेखा बळीराम तायडे(वय 43,रा. इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, बंगला साईड, दौंड) असे गुन्हा दाखल महिलेचे नाव आहे.
दौंड पोलिसांच्या माहितीनुसार,दि.27 एप्रिल रोजी नयन गिरीश तायडे(वय 28,रा. इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, दौंड)व त्यांच्या सासू सुरेखा बळीराम तायडे या दोघी आपापसातील वादामुळे दौंड पोलिस स्टेशनला आल्या होत्या. त्या दोघींमध्ये पोलीस स्टेशन मध्येच वाद सुरू झाले त्यामुळे कार्यरत असलेल्या ठाणे अंमलदार यांनी फिर्यादी महिला पोलीस कर्मचाऱ्यास त्यांची भांडणे सोडविण्यास सांगितले, फिर्यादी भांडणे सोडविण्याकरिता मध्यस्थी करीत असताना आरोपी महिला सुरेखा तायडे हिने मध्यस्थी महिला पोलीस आहेत हे माहित असतानाही त्यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली. दौंड पोलिसांनी सुरेखा तायडे विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे व पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणे प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.