निर्मला सीतारामण यांच्या दौऱ्याने भाजप एकजुटीने कामाला लागले, बारामती लोकसभा मतदार संघ आता भाजपच्या ‘रडारवर’

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौ-यानंतर आता पुणे ग्रामीण भाजपमध्ये नव चैतन्य संचारल्याचे दिसत आहे. त्यांच्या या तीन दिवसाच्या दौ-यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघात त्यांचे विशेष स्वागत करण्यात येऊन कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत होते.

निर्मला सीतारामण यांच्या दौऱ्याला धनकवडी येथून सुरुवात झाली होती. त्यांनी दौऱ्याची सुरुवात भाजप पदाधिकारी यांच्या विशेष संवाद बैठकीने केली. या बैठकीत त्यांनी पक्षसंघटना मजबुत करण्यावर भर दिला. यानंतर त्यांनी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेऊन मतदार संघात राबविण्यात येणा-या विविध रणनितीबाबत समितीमधील नेते,आमदार यांच्याशी संवाद साधत धायरी येथील मुक्ताई गार्डन मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. कार्यकर्त्याचा उत्साह पाहता त्यांनी मोटरसायकल रँलीतही सहभाग घेतला. तसेच पंतप्रधान मोदींच्या विविध योजणांची माहिती देऊन लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप केले.

दुसऱ्या दिवशी निर्मला सीतारामण यांनी जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले या दरम्यान दौंडचे आमदार राहुल कूल यांनी आपली पत्नी कांचन कूल यांना उचलून पाच पायऱ्या चढले ही बातमी दिवसभर सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. जेजुरी नंतर त्यांनी बारामती, इंदापूर येथे दौरा केला आणि कार्यकर्ते, नागरीक यांच्या अडचणी समजून घेतल्या. निर्मला सीतारामण यांच्या या दौऱ्याने भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याचा आणि मरगळ दूर झाल्याचे दिसत होते.

शेवटच्या दिवशी लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामण यांनी दौंड विधानसभा मतदार संघाला भेट दिली. यावेळी त्यांनी तालुक्यातील मतदारांशी थेट संवाद साधत डॉक्टर्स, वकील, व्यापारी, चार्टर्ड अकाउंटंट तसेच व्यापारी बंधू व उद्योजकांशी चर्चा केली व त्यांच्या विविध समस्या समजावून घेतल्या. यावेळी येथील नागरिकांना भेडसावणारे प्रश्न, पाणी, वाहतूक, रोजगार, प्रकल्पबाबत येणाऱ्या अडचणी आमदार राहुल कूल यांनी आपल्या भाषनातून आणि निवेदनातून सीतारामण यांना सांगितल्या. तर शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मधून वगळावे याबाबतचे निवेदन रयत क्रांती पक्षातर्फे निर्मला सीतारामण यांना देण्यात आले.

एकंदरीतच निर्मला सीतारामण यांच्या दौऱ्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून त्यांचे पुढील टार्गेट मिशन बारामती राहणार आहे. खा.सुप्रिया सुळे यांना या अगोदर बारामती लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर आणि त्यानंतर सौ.कांचन राहुल कूल यांनी कडवी झुंज दिली आहे. त्यामुळे यापुढे भाजप संपूर्ण ताकदीनीशी या मतदार संघात उतरून बारामती लोकसभा मतदार संघात आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी आकाश-पाताळ एक करेल यात शंका नाही.

या दौऱ्याप्रसंगी आमदार राहुल कूल, लोकसभा प्रभारी आमदार राम शिंदे, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राहुल शेवाळे, सुनील कर्जतकर, बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.