अख्तर काझी
दौंड : पतीने घरातून हाकलून दिल्याने व नांदवीत नाही म्हणून पत्नी तिला पतीकडून पोटगी मिळावी यासाठी न्यायालयात झगडते आहे याचा राग मनात धरून पत्नीला पतीने भर रस्त्यात मारहाण केली असल्याची घटना दौंड शहरात घडली आहे.
विशाल महेंद्र पाळेकर (रा. पोस्ट ऑफिस, सिद्धार्थ नगर ,दौंड) याच्या विरोधात दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्रुती विशाल पाळेकर (वय 26,रा. मीरा सोसायटी,, दौंड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 30 नोव्हेंबर रोजी फिर्यादी कामावरून घरी परत जात असताना आरोपीने त्यांना रस्त्यात अडविले व तू पोटगी दावा दाखल करून मला पोटगी मागते का? असे विचारत हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून मला पोटगी मागायची नाही अशी धमकीही दिली.
विशाल आणि श्रुतीचे 2016 साली लग्न झाले आहे. परंतु पतीने तिला घरातून हाकलून दिल्याने मागील 6 ते 7 महिने झाले ती माहेरी राहत आहे. पतीने पत्नीच्या नावे घरासाठी बँकेतून कर्ज घेतले आहे. व त्याचे हप्ते फेडण्यासाठी पत्नीने आपल्या वडिलांकडून पैसे आणावेत म्हणून पती तिला मारहाण करीत होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते.
पत्नी वडिलांकडून पैसे आणत नाही म्हणून तसेच त्याचे कोणा महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्यामुळे पत्नीने त्याला सोडचिठ्ठी द्यावी म्हणून तिला त्याच्याकडून सतत मारहाण करण्यात येत होती. पत्नी ऐकत नाही म्हणून तिला घरातून हाकलून देण्यात आले आहे. आणि याबाबत पत्नीने दौंड पोलिसात तक्रारही नोंदविली आहे व विशाल विरोधात तेव्हाही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पती विरोधात दौंड पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवूनही तो मला मारहाण करीत आहे, पोलिसांनी मला न्याय द्यावा अशी मागणी तिने दौंड पोलिसांकडे केली आहे. अशी माहिती पीडित पत्नीने पत्रकारांना दिली.