दौंडमध्ये विधवा, निराधार महिलेवर बलात्कार

अख्तर काझी

दौंड : दौंड तालुक्यातील मळद येथील माध्यमिक शाळेत विद्यार्थिनीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच, शहरातील बाजारपेठेत फिरून स्टेशनरी मालाची विक्री करणाऱ्या निराधार महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संताप जनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी चार जणांवर बलात्कार, विनयभंग व इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे, आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. उषा शिंदे ,रेश्मा विटकर, अमोल विटकर, हरिभाऊ येडे अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, सदरची घटना आठवडा भरापूर्वी शहरातील गोल राऊंड परिसरात असणाऱ्या इंग्रजी माध्यम शाळेच्या शेजारील इमारतीमधील आरोपी उषा शिंदे यांच्या फ्लॅटमध्ये घडली. पीडितेचे पती रस्ते अपघातात मयत झाले आहेत त्यामुळे निराधार झाल्याने त्यांनी त्यांचे चुलते यांच्याशी संपर्क साधून मला कोणाचा आधार नाही, मला कुठेतरी काम द्या असे सांगितले.

चुलत्याने त्यांना दौंड मध्ये राहणाऱ्या उषा शिंदे यांचा फोन नंबर दिला व त्यांच्याकडे तात्पुरते राहण्यास सांगितले. पिडीतेने दौंड मध्ये येऊन उषा शिंदे हिला फोन केला असता ती भेटावयास आली व महिलेला आपल्या घरी घेऊन गेली व म्हणाली की माझ्या मुली शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत आपण दोघी येथे राहू. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवून पीडिता तेथे राहिल्या.

दरम्यान दहा दिवसांपूर्वी उषा शिंदे यांचा भाऊ अमोल विटकर घरी आला व तो सुद्धा तेथे राहू लागला. तेव्हा शिंदे पीडीतेला म्हणाली की त्याचे घरी भांडण झाले आहे तो आपल्या सोबतच राहणार आहे. त्यामुळे पिडीता म्हणाल्या की, मी येथून जाते. त्यावर उषा शिंदे पीडीतेला म्हणाली तुला आता येथेच राहायचे आहे, तुझे कमी जास्त मीच बघणार आहे, हवे तर तू काम करत जा. त्यामुळे पीडिता दौंड शहरामध्ये फिरून स्टेशनरी सामानाची विक्री करून संध्याकाळी घरी मुक्कामाला जात होत्या.

दरम्यान आठवडाभरापूर्वी पीडित व आरोपी उषा शिंदे पाटस रोडवर असणाऱ्या हॉटेलमध्ये जेवायला गेले असता त्या ठिकाणी हरिभाऊ येडे नावाचा माणूस व त्याचा भाऊ येऊन त्यांच्यासोबत बसले. येडे याने उषा शिंदे हिच्यासमोरच पीडितेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. घटनेनंतर महिला व शिंदे घरी आल्या. रात्री 8.30 वा. सुमारास उषा शिंदे हिने कोणालातरी फोन केला व म्हणाली की माझ्याजवळ एक वीस वर्षाचा कोवळा आयटमआहे व फोन कट केला. त्यानंतर पीडिता त्यांच्या खोलीत बसल्या असताना अमोल विटकर तेथे आला, त्यावेळी उषा शिंदे व रेश्मा विटकर यांनी त्याला काहीतरी सांगितले व खोलीचा दरवाजा बाहेरून लावून घेतला.

अमोल याने पीडित महिलेवर रात्री 9ते 11 वाजेपर्यंत अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी आरोपींनी या महिलेला राशीन(जि. नगर) येथील एका घरी नेले. तेथे तिघा आरोपींनी तिला मारहाण केली व कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्या ठिकाणी एक रात्र राहिल्यानंतर पीडित महिलेने आरोपींची नजर चुकवुन तेथून पळ काढला व राशीन हुन बारामतीला आल्या, फरांदवाडी येथून आपल्या आईला बोलावून घेतले व दौंडला येऊन, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या व त्याला सहकार्य करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल केली.