अख्तर काझी
दौंड : शहरामध्ये गांजा या अमली पदार्थाची सर्रासपणे विक्री केली जात असल्याचे समोर येत आहे. सार्वजनिक ठिकाणी गांजा पिणाऱ्या गरदुल्यांविरोधात दौंड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु हाच बडगा गांजा विकणाऱ्यांवर कधी उगारला जाणार असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
रमेश गुरुजी कांबळे (रा. गुलबर्गा), विजय श्री किसन माने (रा. हिंजवडी, पुणे) यांच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायदा 1985 कलम 8(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सुयोग हनुमंतराव ढोब याच्या विरोधात दारूचे सेवन करून वाहन चालविल्याबद्दल मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश कांबळे हा कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाखाली बसून चिलीम द्वारे गांजाचे सेवन करीत होता तर विजय माने हा मौजे वासुंदे गावाच्या हद्दीतील साळुंखे पेट्रोल पंपाच्या बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागेत गांजाचे सेवन करताना पकडला गेला आहे.
सुयोग ढोम्ब हा दारू पिऊन दुचाकी दामटत असताना त्याला पकडण्यात आले. तो आपली दुचाकी वेडी वाकडी चालवीत होता, त्याच्या हातून अपघात होऊ नये म्हणून त्याला थांबविण्यात आले. त्यावेळी त्याच्या तोंडातून उग्र वास येत होता, त्याने मादक द्रव्याचे सेवन केल्याची पोलिसांची खात्री झाल्याने त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्याने मादक द्रव्य सेवन केले असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दौंड शहरात कित्येक वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये गांजा आणला जात आहे. व एजंटामार्फत तो शहरातील विविध ठिकाणी सर्रासपणे विकला जात आहे. शहरात ठीक ठिकाणी गांजा पिणारे गर्दुल्ले आढळतात, शहरात गांजा सहजपणे उपलब्ध असल्याचा हा पुरावा खुले आम दिसतो आहे, मात्र अद्याप पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई केलेली दिसत नाही. शहरात गांजा विकणाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी व्यापार पेठेतून होत आहे.