नदी पट्ट्यात असणाऱ्या गावांमध्ये कर्करोग वाढू लागला

र्करोग म्हणजेच कँसर म्हटले की डोळ्यासमोर साक्षात मृत्यू उभा राहतो. आज मेडिकल सायन्सने खूप प्रगती केली आहे आणि त्यातून कँसर बरा सुद्धा होतो मात्र याचा खर्च आणि उपचार हे प्रत्येक रुग्णाला झेपतीलच असे नाही. त्यातच आता नदी पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांमध्ये कँसर वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे भीमा नदी व मुळा मुठा नदीपट्ट्यातील गावांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा असून हा भाग आता कॅन्सर झोन म्हणून दिवसेंदिवस पुढे येत आहे.

नदी पट्ट्यातील भागांमध्ये कँसरने उग्ररुप धारण करण्याचे नेमके कारण काय असेल याची माहिती देताना कँसर तज्ज्ञ डॉ.विशाल खळदकर यांनी काही विशेष बाबींवर प्रकाश टाकला आहे त्यातील महत्वाची बाब म्हणजे, या नद्यांमध्ये सोडले जाणारे अतिशय घातक असे रासायनिक द्रव्ये… याच रासायनिक द्रव्यांमुळे कँसर आपले हात पाय पसरू लागला आहे. नदी, नाल्यांमध्ये  मोठ्या प्रमाणावर कंपन्यांमधून बाहेर येणारे रासायनिक द्रव्य सोडले जात आहे. 

तर या परिसरातीलच शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधे व कीटकनाशकांचा वापर केला जात असल्याची गंभीर बाब घडत असल्यामुळे आता गावोगावी कॅन्सरचे रुग्ण वाढत चालले आहेत आणि हा आकडा आता झपाट्याने वाढू लागला आहे. नुकताच दौंड तालुक्यामध्ये एका तरुण युवकाचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्याची पार्श्वभूमी अशी होती की त्याला कसलेही व्यसन नव्हते. मात्र तरीही कँसरने त्या युवकाचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेने अनेकांचे डोळे खाडकन उघडले आहेत. आता कर्करोग या आजाराबद्दल डॉक्टरांकडे जावून चर्चा होऊ लागली आहे. पूर्वी कर्करोग हा तंबाखू खाल्ल्याने व धुम्रपान केल्याने होतो असे म्हटले जायचे. आजकाल कर्करोग हा दारू सेवन, कीटकनाशक व खतांच्या वापरातील भाजीपाला, अन्नधान्य खाणे, स्थूलता, तणाव, अनुवंशिकता, बदलती जीवनशैली या कारणांमुळे सुद्धा होत आहे. सध्या कर्करोगाचे प्रमाण दर १०० नागरिकामागे २.१ आहे.

परंतु लवकरच एकूण आजाराच्या २५% रुग्ण हे कर्करोगाचे असतील असे तज्ञांचे मत आहे. पुरुष आणि महिला यांच्या तुलनेत महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. अनेक महिलांना स्तनांचा कॅन्सर असल्याचे निदर्शनास आले आहे. कोल्हापूर, जयपुर ,गडचिरोली व गुडगाव ही ठिकाणे कॅन्सर बेल्ट म्हणून ओळखली जातात त्याप्रमाणे भविष्यातील नदीपट्ट्यातील प्रदेश हा दिवसेंदिवस कॅन्सर झोन म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागातील विशेषता नदीपट्ट्यातील दिवसेंदिवस वाढणारी कॅन्सर रुग्णांची संख्या हा चिंतेचा विषय आहे. प्रत्येक महिन्याला माझ्याकडे ३०० कीमोथेरपी व ३५ शस्त्रक्रिया होत आहेत. कॅन्सरची भीषणता लक्षात येते. ग्रामीण भागामध्ये सर्वांना सुविधा उपलब्ध करून प्रयत्न असतो. कॅन्सर पासून दूर राहण्यासाठी सेंद्रिय भाजीपाला, अन्न, नियमित व्यायाम, नदी प्रदूषण रोखणे , स्थिर जीवनशैली यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. डॉ.विशाल खळदकर (कँसर तज्ज्ञ)