अख्तर काझी
दौंड : देशामध्ये महायुतीचे सरकार येणार आहे, नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत, मोदी विकास पुरुष आहे, गरीब कुटुंबातून जन्माला आलेले मोदी बौद्ध धर्माला मानणारे आहेत त्यामुळे मोदी संविधान बदलतील, ते लोकशाही संपवतील अशा पद्धतीचा प्रचार अत्यंत खोटा आहे. त्यावर कोणी विश्वास ठेवू नये. या देशाचे संविधान कोणी बदलू शकत नाही आणि जो कोणी या देशाचे संविधान बदलेल त्याला आम्ही या देशातून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही, कारण संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही, त्यामुळे या देशाचे संविधान बदलण्याचा प्रश्नच त्यामुळे येत नाही असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ दौंड मधील आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, तसेच आरपीआय, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले की, वो लोग बात करते है बडी बडी… लेकिन चुनके आनेवाली है सुनेत्रा पवार की घडी. यापूर्वी शरद पवार साहेब होते माझ्या अगदी जवळचे मित्र, पण सध्या माझ्याजवळ आहे अजित दादांचे चित्र… नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे हे आहे माझे सूत्र…. कारण मी आहे माझ्या लाडक्या भिमाचा पुत्र.
अजित पवार डॅशिंग व्यक्तिमत्व आहे, विकासाच्या कामांमध्ये गतिशील असणारे त्यांचे नेतृत्व आहे. बारामतीच्या विकासामध्ये आणि राज्याच्या विकासामध्ये अजित दादांचे नाव आहे. लोकसभेची ही लढाई जिंकण्यासाठी आणि देशाच्या विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्व काम करतो आहोत. दलित समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे आणि आमच्या महायुतीच्या सरकारच्या वतीने शिष्यवृत्तीच्या माध्यमातून हुशार विद्यार्थ्यांना लाखो रुपये देण्याचा आमचा प्रयत्न असतो. नरेंद्र मोदी दलित ,आदिवासी ,अल्पसंख्यांक समाजाच्या बाजूने आहेत. आणि म्हणूनच सबका साथ सबका विकास हाच आहे त्यांचा नारा…. म्हणून जागा होत आहे भारत सारा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहे आमच्या देशामध्ये चमकणारा तारा आणि 2024 च्या निवडणुकीमध्ये वाजवून टाकू आम्ही राहुल गांधींचे बारा.
सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे, त्या तीन वेळेला निवडून सुद्धा आलेल्या आहेत. त्या चांगले बोलतात, आता सुनेत्रा पवार यांना चांगले बोलू द्या, त्यांना भूमिका मांडू द्या अशी कोपरखळी आठवले यांनी यावेळी मारली. सुनेत्रा पवार यांना पाठिंबा मिळतो आहे, त्यामुळे अजितदादा आपल्याला चिंता करण्याची कारण नाही, आरपीआय तुमच्या पाठीमागे आहे आणि आरपीआय ज्यांच्या पाठीमागे जाते त्यांना निवडून येण्याची संधी मिळते असेही रामदास आठवले म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, उद्याची निवडणूक भावकीची, गावकीची निवडणूक नाही. ही देशाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे. देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा या साठीची निवडणूक आहे. आज जर देशात बघितले तर अनेक नेतेगण दिसतात, परंतु तुमच्या माझ्या भारत देशाला एक मजबूत, खंबीर नेता, एक खऱ्या अर्थाने व्हिजन असणारा नेता, जागतिक पातळीवर भारताचा नवलौकिक वाढविणारा नेता जर कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. आणि म्हणूनच महायुतीतील सर्व घटक पक्षांनी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी पाठिंबा दिला आहे. विरोधकांकडे या निवडणुकीत कोणताच मुद्दा राहिलेला नाही, त्यामुळे विरोधक कारण नसताना वाटेल तशा प्रकारचे खोटे आरोप नरेंद्र मोदींवर करत आहेत. मोदी निवडून गेले की आता यापुढे निवडणुका होणार नाही, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिले आहे ते बदलणार, त्यांची घटना बदलणार असे खोटे बोलत आहेत. मी आपणा सर्वांना सांगतो बाबासाहेबांनी देशाला इतकी चांगली संविधान व घटना दिली आहे की, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपली घटना आणि संविधान कोणीही बदलू शकत नाही. 2014 ला मोदी पंतप्रधान झाले, त्यांनी संविधान दिन साजरा करण्याचे ठरविले, त्यांनी कोठेही संविधानाला धक्का लावला नाही. माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये चलबिचल निर्माण करण्याकरिता त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याकरिता एक भीती दाखविण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे. अल्पसंख्याकांना भीती दाखविली जात आहे, उलट अल्पसंख्याकांना पूर्ण संरक्षण देण्याचे काम मोदी सरकारकडून होत आहे. आणि आम्ही सुद्धा राज्यात त्याच पद्धतीने काम करीत आहोत.
त्यामुळे आपण कोणीही काळजी करू नये. हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली ती अठरा पगड जाती, बलुतेदारांना घेऊन केली. हा इतिहास आपल्याला विसरता येणार नाही. आज आपल्या आजूबाजूची राष्ट्रे आपल्याकडे वाकड्या नजरेने बघत नाहीत. त्यांना जशास तसे उत्तर पुलवामा च्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. मोदी यांची प्रशासनावर पकड आहे, जरब आहे. त्यांनी एकदा निर्णय घेतला की तशा प्रकारची यंत्रणा त्वरित हलते. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कधीही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, याउलट मागच्या सरकारवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा कारभार पारदर्शकपणे चाललेला आहे. भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे ध्येय नरेंद्र मोदींचे आहे. देशातला एकही गरीब माणूस उपाशीपोटी झोपता कामा नये म्हणून 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय मोदींनी घेतलेला आहे. अशा पद्धतीने समाजातील सर्व घटकांना कसा न्याय देता येईल याबद्दलचे काम एनडीए सरकार करत आहे. असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले की, या शहराला राज्याचा निधी मिळाला, परंतु आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे की येथे केंद्राचा सुद्धा निधी आला पाहिजे, कारण राज्यापेक्षा कितीतरी पटीने केंद्राचा निधी जास्त असतो. रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी, उड्डाणपूल उभारण्यासाठी, नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी तसेच इतर सेवा सुविधांसाठी हा निधी वापरता येणार आहे. बारामती मधून 10-15 वर्ष आपण जो खासदार निवडून देतो आहोत त्यांचे आणि केंद्राचे जमत नाही. केंद्र एका विचाराचे तर खासदार दुसऱ्या विचाराचा. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघाचा जो विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही. तो बॅकलॉग आहे, तो आपल्याला भरून काढायचा आहे. या ठिकाणी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेची गरज आहे, विद्या प्रतिष्ठान सारखे एक चांगल्या प्रकारचे शैक्षणिक संकुल दौंड च्या परिसरामध्ये निर्माण करण्याचे आता आम्ही ठरविलेले आहे आणि त्यासाठी तुमच्या पवित्र मताची गरज आहे असे ही अजित पवार म्हणाले.