मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
‘कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे’, हा जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी दिलेला इशारा खोटा ठरवायचा असेल तर, नागरिकांनी तो गांभीर्यानं घेऊन सावध व्हावं आणि पुढचे काही दिवस बाहेर न पडता लॉकडाऊन नियमांचं पालन करावं असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेसबुक पेजवरून जनतेला केले आहे.
अजित पवारांनी याबाबत नागरिकांना आवाहन करताना नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये, स्वत:सह कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये. नियमांचं मनापासून, स्वयंशिस्तीनं पालन करावे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात, मालेगावसारख्या शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून ही चिंतेची बाब आहे. २४ मार्चच्या आधीपासून लॉकडाऊन जाहीर करूनही राज्यात रुग्ण संख्या साडेचार हजारांवर गेली आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, डॉक्टर, पोलीस, या सर्वांनी आपल्याला घराबाहेर न पडण्याचं, घरातच थांबण्याचं, गर्दी न करण्याचं, सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या आवाहनानुसार आम्ही देखील सामाजिक अंतराचं भान राखून, सुरक्षितता बाळगून कर्तव्ये पार पाडत आहोत. नागरिकांनी दाखवलेला संयम, सहकार्यामुळेच राज्यातील काही जिल्हे आजही कोरोनामुक्त आहेत. नांदेड, सांगलीसारखे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्यापासून बोध घेऊन आपला जिल्हा सुद्धा कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करूया. घरातंच थांबण्याचा निर्धार केल्यास कोरोनाच्या लढाईत आपला विजय नक्की आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. तर कोरोनाविरुद्धच्या लढाईत जात-पात, भाषा-प्रांत, धर्म-पंथ विसरून एकजुटीनं साथ देण्याची गरज आहे. तो संपेपर्यंत कुठल्याही प्रकारचा वाद-विवाद-विसंवाद टाळला पाहिजे असे सांगत पालघर जिल्ह्यातील गडचिंचले चौकीपाडामधील घटना माणुसकीला काळीमा फासणारी, निषेधार्ह असून सर्व दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल असे आश्वासन दिले आहे.