दौंड मधील रेशनिंगचे धान्य नेमके कोठे जाते..? रेशनिंग दुकानदारांना ठेकेदाराकडून धान्य पुरवठा नाही, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा आंदोलनाचा इशारा

दौंड (अख्तर काझी) : केंद्र आणि राज्य सरकार मार्फत देशातील व राज्यातील गरजूं साठी विविध शासकीय योजना राबविल्या जात आहेत. त्याच योजनेअंतर्गत राज्यातील रेशनिंग दुकानातून गरजू लाभार्थींना मोफत धान्य योजना कार्यरत आहे. मात्र दौंड शहरातील लाभार्थींना योजनेतील धान्यांपासून वंचित ठेवले जात असल्याचे चित्र दिसत आहे. रेशनिंग दुकानदारांसाठी सरकारी गोदामातून उचललेले धान्य दुकानदारांपर्यंत पोहोचतच नाही अशी वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे.

रेशनिंग दुकानदारांना धान्य पुरवठा करणारा ठेकेदार सरकारी गोदामातून धान्य उचलत आहे परंतु ते धान्य रेशनिंग दुकानदारांपर्यंत पोहोचत नाही अशी तक्रार दौंड शहर व तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी तहसीलदार यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

निवेदनात असे नमूद केले आहे की, अध्यक्षांच्या श्री समर्थ ग्राहक भांडार चे जुलै 2024 चे PHH ,13 कट्टे तांदूळ व 10 कट्टे गहू ठेकेदाराने दिलेला नाही. तसेच डिसेंबर 2024 चे 3094 किलो तांदूळ व 500 कीलो गहू सुद्धा दिलेला नाही. याबाबत अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. ही बाब लज्जास्पद असून याबाबत त्वरित कार्यवाही करून धान्य दुकानात धान्य टाकण्यासाठी योग्य ते आदेश व्हावेत अन्यथा मला जानेवारी महिन्याचे धान्यवाटप करता येणार नाही व त्यामुळे नाईलाजास्त कायदेशीर स्वरूपात आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही पाटील यांनी निवेदनातून दिलेला आहे.

शहरातील आणखीन ही रेशनिंग दुकानदारांच्या अशाच प्रकारच्या तक्रारी पुढे येत आहेत. संबंधित ठेकेदारामुळे शहरातील लाभार्थी आपल्या हक्काच्या धान्यांपासून वंचित राहत आहेत. संबंधित ठेकेदार सरकारी गोदामातून उचललेल्या मालाचे नेमके करतो काय? असा प्रश्न रेशनिंग दुकानदार व लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.