दौंड शहरात पाऊस आला की बत्ती गुल, कचरा मात्र झालाय फुल्ल..

अख्तर काझी

दौंड : जून महिना सुरू होण्याआधीच वरूणराजाने बरसायला सुरुवात केलेली आहे. दौंड मध्ये सुद्धा तो जोमाने बरसतो आहे, पाऊस बरसला की शहरातील बत्ती गुल (विज) हे समीकरण दौंडकर वर्षानुवर्ष अनुभवत आहेत. महावितरण वीज कंपनीने पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाला सुरुवात केलेली दिसत आहे परंतु त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही त्यामुळे पाऊस आला की बत्ती गुल आणि शहरात झालाय कचरा फुल्ल अशी म्हणण्याची वेळ दौंडकरांवर आली आहे.

या सर्व संतापजनक प्रकाराने शहरातील व्यापारी वर्ग, सामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झालेले आहेत. आणि पाऊस आला की बत्ती गुल या घडणाऱ्या प्रकारांबद्दल महावितरणकडे कोणतेही समाधानकारक उत्तर नाही. या समस्येतून दौंडकरांची सुटका व्हावी तसेच शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना, शेतकरी बांधवांना योग्य पद्धतीने वीज पुरवठा व्हावा याकरिता आमदार राहुल कुल यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी महावितरण ला उपलब्ध करून दिलेला असताना सुद्धा या समस्येतून दौंड करांची सुटका का होत नाही व त्यासाठी नेमके काय करावे लागणार? या परिस्थितीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महावितरणने या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी योग्य ती उपाययोजना राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वारंवार होणाऱ्या बत्ती गुल मुळे आधीच त्रस्त झालेल्या दौंडकरांना आता शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यांनी सुद्धा परेशान केले आहे. शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

त्यातच आता पाऊस सुरू झाल्याने दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे, यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगरपालिकेने शहर स्वच्छतेसाठी उपाय योजना राबवावी अशी मागणी दौंडकर करीत आहेत.