बारामतीमध्ये चाललंय तरी काय! दिवसा ढवळ्या महिलांना लुटलं जातंय

बारामती : बारामतीमध्ये सध्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शहर असो कि ग्रामीण भाग, दिवस असो कि रात्र सगळीकडे दुचाकीवरील चोरट्यांकडून महिलांच्या अंगावरील दागिने लुटण्याचे सत्र सुरु झाले आहे.

काल-परवाच बारामती तालुक्यातील आंबी येथील एका जेष्ठ महिलेच्या घरी जाऊन तिचे दागिने लुटण्याचा प्रकार घडत नाही तोच काल रात्री पुन्हा बारामती शहरामध्ये तशीच एक घटना भर रस्त्यावर घडली आहे. त्यामुळे बारामती पोलिसांच्या कार्यतत्परतेवरच नागरीक संताप व्यक्त करु लागले असून बारामतीमध्ये पोलिसांचा धाक राहिला नसल्याची चर्चा नागरीक करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २५/०८/२०२२ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास सुर्यनगरी, बारामती येथील अहिल्यादेवी होळकर क्लब हाउसच्या समोरील रोडवरून फिर्यादी माया शत्रुघन शेळके (रा.संभाजीनगर, बारामती ) ह्या त्यांची भावजय रेश्मा दिपक नांदे, मैत्रीण वर्षा बाबासाो गिड्डे, सारिका प्रकाश जाधव, कुमुदिनी महादेव हेगडे (सर्व रा.सुर्यनगरी, बारामती) यांच्यासोबत त्यांची मैत्रीण कल्याणी संतोष शिंदे यांच्या सुनेचे डोहाळे जेवणचा कार्यक्रम आटोपून घरी पायी चालत जात होत्या. त्याचवेळी रोडच्या कडेला उभा असलेल्या एका आनोळखी इसमाने अचानक फिर्यादी यांच्या जवळ येवून त्यांच्या गळयातील 1 लाख 25 हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठण बळजबरीने हिसका मारून चोरले आणि पळत जावून थोडया अंतरावर मोटार सायकल घेवून उभ्या असलेल्या त्याच्या साथीदारासोबत तेथून धूम ठोकली.

बारामती शहरामध्ये रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ज्यावेळी सर्वत्र लगबग सुरु असते अश्यावेळी इतक्या महिलांसमोर चोर येऊन गळ्यातील दागिने ओरबाडतात आणि ते तोडून घेऊन जातात यावर या महिलांना अजूनही विश्वास बसत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून बारामती शहर आणि ग्रामीण भागामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांचा धाक राहिला नसल्याने हे चोरटे खुलेआम अश्या चोऱ्या करण्याचे धाडस करत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.