दादा, मुलींच्या मोफत शिक्षणाचे काय झाले..?  ऐनवेळी पालकांनी पैसे कुठून आणायचे

पुणे : मुलींना संपूर्ण मोफत शिक्षण देणार अशी घोषणा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली मात्र आता जून महिना अर्धा संपला तरीही मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत अजून कोणताच जीआर काढण्यात आलेला दिसत नाही त्यामुळे मुलींना मोफत शिक्षण
देण्याची मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा ही फक्त घोषणाच होती की काय असा प्रश्न आता पालक वर्गातून विचारला जात आहे.

अ‍ॅडमिशनला पैसे नसल्याने केडगाव येथील सायन्सच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

उच्च शिक्षणासाठी मुलींना अ‍ॅडमिशन घेण्यासाठी पालक कॉलेजेसमध्ये गेल्यानंतर त्यांना संपूर्ण फी भरावी लागेल, शासनाकडून आम्हाला कोणतेही पत्र, जीआर आला नसल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी यांसह ६६२ अभ्यासक्रमांना मोफत प्रवेश मिळणे अपेक्षित होते. परंतु याबाबत कॅबीनेटमध्ये चर्चा झाली किंवा तशा आशयाचा शासन निर्णय वगैरे प्रकाशित झाल्याचे दिसून येत नाही. यामुळे यावर्षी सदर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. खुद्द मंत्रीमहोदयांनी हि घोषणा केल्यामुळे त्याचे गांभीर्य आहे. परंतु अद्याप याबाबत काहीच झालेले दिसत नाही. या सरकारमधील मंत्री केवळ सवंग लोकप्रियतेसाठी अशा पद्धतीच्या घोषणा करीत आहेत, हि अतिशय खेदाची आणि निषेधार्ह बाब असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

मंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी केलेल्या घोषनेची शासनाने त्वरीत अंमलबजावणी करावी, मुलींना १००% मोफत शिक्षण द्यावे अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.