दौंड : दौंड तालुक्यातील वाखारी येथील रहिवासी असलेले भरत भिवा भापकर आणि सौ.कमल भरत भापकर यांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. भापकर दांपत्याच्या 50व्या वाढदिवसानिमित्त महेंद्र भरत भापकर, शंकर भरत भापकर, शिवाजी भरत भापकर या त्यांच्या मुलांनी सामाजिक संस्था आणि शाळांना सुमारे 50 हजार रुपयांची देणगी दिली तसेच बीड चे महादेव महाराज राऊत यांच्या किर्तनाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.
या कार्यक्रमाला दौंडचे माजी आमदार रमेशआप्पा थोरात, ज़िल्हा परिषद सदस्या राणीताई शेळके, भिमा पाटस चे मा. संचालक धनजीभाई शेळके, साई स्टोन उद्योग समूहाचे मालक राजेंद्र उगले, बारामती तालुका कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक बबनराव बोरकर, हरिदास बोरकर, वाखारी गावचे सरपंच काळुराम केंजळे यांसह दौंड तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमानिमित्त एक वृक्ष एक मित्र केडगाव या संस्थेला 11 हजार, भंडारदरा प्रसादिक दिंडी हवेली व तपोनिधी नारायण महाराज यांच्या मंदिराच्या बांधकामासाठी 11 हजार, संत निरंकारी भवन, राजेवाडी बांधकामासाठी 11 हजार, भालेकर परिवार 11 हजार, नंदिनी गो शाळा एकेरीवाडी 2 टन चारा आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाची दौंड चे माजी आमदार रमेश थोरात आणि ग्रामस्थांनी स्तुती केली.