Water issue : कोरोना काळात नगरपालिकेने दौंड उपजिल्हा रुग्णालयाला नियमित पाणीपुरवठा करावा – वैशाली नागवडे



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

दौंड उपजिल्हा रुग्णालयाला भासणारी पाणी टंचाई दौंड नगर पालिकेने दूर करून रुग्णालयाला नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी केली आहे. नागवडे यांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांना याबाबत निवेदन दिले. 

सध्या शहर व परिसरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या रोज वाढत आहे त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी बाधित रुग्णांचा ओघ वाढला आहे, अशा परिस्थिती मध्ये रुग्णालयातील बाधित रुग्णांसह सामान्य रुग्णांना या ठिकाणी पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे. 

न. पा. कडून सध्या रुग्णालयाला टँकरने पाणीपुरवठा होत असून तो वेळेवर होत नाही. तरी या प्रश्नाकडे न. पा. ने त्वरित लक्ष घालून रुग्णालयातील पाणी टंचाई बाबतचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी वैशाली नागवडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील पाणी टंचाई विषयाला अनुसरून वैशाली नागवडे यांनी येथील पंचायत समिती कार्यालयात बैठकही घेतली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संग्राम डांगे, न. पा. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शिवदत्त भोसले, नगरसेवक वसीम शेख, प्रशांत धनवे,वैशाली धगाटे आदी उपस्थित होते. उप जिल्हा रुग्णालयाला नगर पालिके कडून अनियमित पाणी पुरवठा होतो आहे त्यामुळे न. पा. ने कोरोना काळात तरी नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी न. पा. कडे यापूर्वीच केली असल्याचे डॉ. संग्राम डांगे यांनी  या वेळी सांगितले. 

नगर पालिकेच्या वतीने आता नियमितपणे रोज पाण्याचे 5 टँकर उपजिल्हा रुग्णालयाला देण्याचे आश्वासन नगरसेवक वसीम शेख व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यावेळी देण्यात आले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती राज्यस्तर नगरोत्थान योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सध्या सुरू आहे, अडीच लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उपजिल्हा रुग्णालय आवारात बांधण्याचे न. पा. चे नियोजन आहे. 

शासनाने सदरची जागा नगर पालिकेस दिल्यास उपजिल्हा रुग्णालया बरोबरच शेजारील दोन, तीन प्र भागांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो असे अभियंता शिवदत्त भोसले यांनी यावेळी सांगितले. न. पा. च्या जागा मागणीचा विषय संबंधित खात्याकडे पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वैशाली नागवडे यांनी सांगितले.