|सहकारनामा|
दौंड : दौंड शहरातील शिरापूर रोड परिसरातील सिंधी मंगल कार्यालया शेजारील काही घरांमध्ये तुंबलेल्या गटारीचे पाणी जात असून येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील नागरिकांनी नगर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत परंतु नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज दि 7 जून रोजी येथील पतीत पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांची भेट घेत सदर तक्रारीचे निवेदन पुन्हा दिले.
येथील नागरिक मागील सहा ते सात महिने या कामाबाबत नगरपालिका कार्यालयाकडे पाठपुरावा करीत आहेत, परंतु नगरपालिका मुद्दाम पणे टाळाटाळ करत असल्याचा आरोप पतीत पावन संघटनेने केला आहे. कोरोना महामारी मुळे आधीच सर्व जण त्रस्त आहेत त्यात नागरिकांच्या घरांमध्ये तुंबलेल्या गटारीचे पाणी जात असल्याने त्या ठिकाणी होणाऱ्या आजाराच्या प्रादुर्भावास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे, व यातून लवकर मार्ग काढण्याची विनंती केली आहे. निवेदन देते वेळी मा. नगराध्यक्ष योगेश कटारिया, रोहित पाटील, माणिक सोनवणे आदि उपस्थित होते.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे येथील मुख्य रस्त्यावरच खड्डा झाल्याने रोजच्या होणाऱ्या पावसाचे पाणी या खड्ड्यामध्ये साचत आहे, येथून लोकांचे चालणे मुश्किल झाले आहे, पाण्याने भरलेल्या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेकदा दुचाकींचे अपघातही या ठिकाणी होत आहे. ही बाबही नगरपालिकेला कळविण्यात आली आहे मात्र या बाबतही नगरपालिका दुर्लक्षच करीत आहे. त्यामुळे आता तक्रार तरी कोणाकडे करावयाची असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.