सांगली जिल्ह्यामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष ! पाणी काटकसरीने वापरण्याचे मनपा प्रशासनाचे आवाहन, नद्यांमधील पाणी पातळीतही कमालीची घट 

सुधीर गोखले

सांगली : कृष्णा नदीच्या तीरावरील गावांना पाणीपुरवठा आणि शेतीसाठी करण्यात आलेल्या कोयना धरणा तील विसर्ग कमी केल्यामुळे सांगली शहरानजीक कृष्णा नदीने तळ गाठला आहे. परिणामी मनपा चे जॅकवेल उघडे पडले असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

यासंदर्भात मनपा प्रशासनातील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले पावसाने ओढ दिल्याने आणि म्हैसाळ आणि इतर सिंचन योजनांसाठी कोयना धरणातून विसर्ग सुरु असल्याने धरणातील पाणीपातळी खालावली आहे सध्या धरणातून २००० क्युसेक्स विसर्ग होत होता तो आता फक्त १०५० करण्यात आला आहे. परिणामी मनपा जॅकवेल जवळ पाणी साठा घटत आहे अजून किती दिवस हा पाणी साठा राहील याचा अंदाज बांधणे कठीण आहे त्यामुळे भविष्यात पाणी पुरवठा खंडित होऊ शकतो किंवा अनियमित होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे. 

सध्या मनपा सांगलीतील नागरिकांना ८० दशलक्ष तर मिरजेतील नागरिकांना ३० दशलक्ष लिटर पाणी कृष्णा नदीतून पुरवते पण सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे पाणी पातळी  कमालीची घटत आहे. हरिपूर जवळील कृष्णा वारणेच्या संगमामुळे मिरज कर नागरिकांना पाण्याची टंचाई फारशी भासलेली नाही पण वारणा धरणातही पाणी साठा कमी होत चालला आहे वेळेवर पाऊस सुरु न झाल्यास पाण्याचे दुर्भिक्ष सर्वत्र होईल यात शंका नाही.