गायरान जागेत नव्याने RCC बांधकामे करणाऱ्यांवर दिखाऊ कारवाई नको, ठोस बंदोबस्त हवा

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी गायरान जमिनीमध्ये अतिक्रमने झाली आहेत. मात्र काही धनदांडग्यानी गायरान जमिनीत थेट Rcc बांधकामे सुरु केल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दौंड तालुक्यातील वाखारी या गावात पीर बाबांची पूजा अर्चा करण्याचे काम पाहणाऱ्या काही मुजावर लोकांनी गायरान जमीन गट नं. १ मध्ये थेट Rcc ची पक्की बांधकामे सुरु केल्याने वाखारी ग्रामपंचायतच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. याबाबत ग्रामसेवक, सरपंच यांना विचारले असता आम्ही 3-3 नोटीस दिल्या आहेत असे सांगितले जाते. मात्र अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांचे लांगुलचालन करण्यात येत असल्याचे दिसत आहे.

मात्र ग्रामपंचायतकडून नोटीस देण्याचा इतिहास पाहिला तर नोटीस देऊन सुद्धा स्लॅब लेव्हलपर्यंत काम कसे झाले हा संशोधणाचा विषय म्हणावा लागेल. ज्यावेळी हे बांधकाम सुरु होते त्यावेळी काही पत्रकार ग्रामसेवकांना फोन करत होते मात्र त्यांनी फोन न उचलण्याचे कार्य सुरु ठेवले होते.

या कामाबाबत एक महिला पत्रकार ज्यावेळी ग्रामपंचायत मध्ये गेल्या त्यावेळी संबंधित कामाविषयी माहिती मागितली असता त्यांना ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अनेक प्रश्न विचारून याच अतिक्रमण बाबत कारवाईची माहिती का हवी आहे असे म्हणत अतिक्रमण धारकांवर काढण्यात आलेल्या नोटीस ची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा अनुभव त्यांना आला.

मात्र हे अतिक्रमण Rcc बांधकाम आहे. अश्या प्रकारची पक्की घरे ही आपण डोळ्यादेखत कसे होऊ देता असा प्रश्न महिला पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर त्यांचा लेखी अर्ज घेऊन संबंधित अतिक्रमण विषयक माहिती देण्यात आली. वाखारी ग्रामपंचायतमध्ये सध्या सावळा गोंधळ सुरु असून या ठिकाणी माहिती घेण्यास येणाऱ्यांना खूपच दुजाभावाची वागणूक मिळताना दिसत आहे.