‘दौंड तालुका खरेदी-विक्री’ संघाच्या 3 जागेसाठी मतदान सुरु, माजी आमदार ‘रमेश थोरात’ यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये ‘उत्साह’

सहकारवार्ता : अब्बास शेख

दौंड तालुका खरेदी-विक्री संघाच्या 17 पैकी 14 जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 3 जागेंसाठी आज केडगाव (गावठाण) येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेमध्ये सकाळी 8 वाजता उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्राबाहेर माजी आमदार रमेश थोरात हे सकाळपासून उपस्थित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे.

मतदान केंद्रावर शांततेत सुरु असलेले मतदान

आज सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी 9:30 वाजेपर्यंत 50% मतदान झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. पाटस, वरवंड आणि पिंपळगाव येथील 3 जागेंसाठी हि लढत होत असून पिंपळगाव येथील एक अपक्ष उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड झाल्याचे पहायला मिळत आहे. तर वरवंड येथील एका जागेसाठी कूल गटाचे सचिन सातपुते विरुद्ध थोरात गटाचे संजय धायगुडे यांच्यामध्ये चूरस पहायला मिळत आहे. येथील अपक्ष उमेदवार लक्ष्मण दिवेकर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.

माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुका खरेदी विक्री संघावर आत्तापर्यंत 14 जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 3 जागेंसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी म्हणून हर्षित तावरे हे काम पाहत असून केंद्र अध्यक्ष म्हणून प्रकाश शितोळे आणि मतदान अधिकारी म्हणून अनिल होले हे काम पाहत आहेत.

मैत्री पूर्ण लढतीचे चित्र…

माजी आमदार रमेश थोरात यांसह मतदान केंद्रावर, अरुण भागवत, गोरख दिवेकर, संजय दिवेकर, आप्पासाहेब पवार हे एकत्र बसून मैत्रीपूर्ण लढतीचा आनंद घेत असल्याचे चित्र आमच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

निकाल आजच
आजच्या तीन जागेंसाठी सायंकाळी 4:30 वाजता निकाल जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. 17 पैकी 14जागेवर माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने गुलाल उधळला असून आज या तीन जागेंवर गुलाल कोण उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.