दौंड (वाखारी) : श्रीलंकेतील केलेनिया विद्यापीठातील प्राध्यापक सन्माननीय, डॉ.ए.जी. आमरसिंघे, डॉ.मुंथुर ईब्राहिम आणि डॉ.सप्तर्षी गणेश यांनी ‘धनाजी शेळके कॉलेज ऑफ फार्मसी’ या महाविद्यालयाला नुकतीच भेट दिली. या भेटीमुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना फार्मसी क्षेत्रातील नवीनतम संशोधन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या प्रगतीविषयी माहितीचा महत्वपूर्ण अनुभव प्राप्त झाला.
यावेळी धनशोभा फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष धनाजी शेळके यांनी सन्माननीय प्राध्यापक डॉ. ए.जी. आमरसिंघे, डॉ.मुंथुर ईब्राहीम आणि डॉ.सप्तर्षी गणेश यांचे स्वागत करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती दिली. यानंतर, डॉ.ए.जी.आमरसिंघे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आणि फार्मसी क्षेत्रातील नवीन ट्रेंड्स, नवे उपचार, तसेच औषध संशोधनाच्या भविष्यकालीन दृष्टीकोनावर चर्चा केली. ही भेट फार्मसी क्षेत्रातील जागतिक सहकार्य आणि प्रगतीला प्रोत्साहन देणारी ठरली.
डॉ.मुंथुर ईबारहीम यांनी बोलताना, “भारतीय महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनाची पातळी उच्च आहे, आणि यामुळे जागतिक स्तरावर यशस्वी व्यावसायिक तयार होऊ शकतात.” असे मत व्यक्त केले. यावेळी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या भेटीचा भरपूर लाभ घेतला आणि फार्मसी शिक्षणासंबंधी अनेक मुद्द्यांवर आपले विचार मांडले. डॉ.सप्तर्षी गणेश यांच्या या भेटीमुळे महाविद्यालयातील वातावरणात एक सकारात्मक बदल जाणवून विद्यार्थ्यांना भविष्यकाळात त्यांच्या करिअरच्या विकासासाठी नवीन दिशा मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सचिव सौ.राधिका शेळके, संचालक परीक्षित शेळके, एस.बी. कुल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. दिवेकर सर, प्राचार्य डॉ.संतोष वाघमारे आणि विभाग प्रमुख प्रा.विकास गडधे सर व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.