वैशाली नागवडे यांची आ. कुल यांच्या वाढदिवसावरून टिका तर आ.‘कुल’ यांच्याकडून ‘हे’ उत्तर

दौंड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या वैशाली नागवडे यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवस साजरा करण्यावरून टिका केली आहे. वैशाली नागवडे यांनी, मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणास पांठिबा दर्शविण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, शहरात साखळी उपोषण, आमरण उपोषण, पुढाऱ्यांना गावबंदी अशी तीव्र आंदोलने सुरु आहेत असे म्हटले आहे.

तसेच आपल्याही दौंड तालुक्यात सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी शुक्रवार दि.२७.१०.२०२३ पासून आंदोलने सुरु आहेत. मराठा समाजाच्या भावना मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभर आज तीव्र आहेत. आम्हाला दौंडकरांना आपल्याकडून अपेक्षा होत्या, कारण आपली एक अभ्यासु व प्रश्नांची जाण असलेला आमदार म्हनून आपली ख्याती आहे असे म्हणतात परंतु आपण व आपले काही कार्यकर्ते आपला वाढदिवस साजरा करण्यात दंग राहिलात. या गोष्टीमुळे एक मराठा भगिनी या नात्याने मी तीव्र शब्दात माझी नाराजी व्यक्त करत आहे. आपला एक समाज बांधव मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी जीवन-मरणाची लढ़ाई लढ़त असताना आपण इकडे आपला वाढदिवस साजरा करीत आहात ही बाब समाजाभिमुख आहे का? कारण आपण आमचे लोकप्रतिनिधि आहात व मराठा समाजाचे पण आहात असे सौ. नागवडे यांनी म्हटले असून

मराठा आरक्षणाला फक्त मराठा लोकप्रतिनिधि नाही तर सर्व समाज बांधव व विविध संघटना, विविध पक्षाचे नेते ही पाठिंबा देत आहेत. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण आरक्षणासाठी बसलेल्या कार्यकर्त्यांबरोबर उपोषणासाठी बसला असता तर आम्हांला दौंडच्या जनतेसाठी अभिमानाची गोष्ट वाटली असती व आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटला असता. परंतू आपण समाजहित लक्षात न घेता वाढदिवस साजरा करण्यात मग्न राहिलात याबाबत मी एक मराठा समाजाची भगिनी या गोष्टीची जाहिरपणे नाराजी व्यक्त करत आहे असे शेवटी वैशाली नागवडे यांनी म्हटले आहे.

आमदार ‘राहुल कुल’ यांचे उत्तर.. वैशाली नागवडे यांच्या आरोपानंतर आमदार राहुल कुल यांनी आपली भूमिका मांडताना, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधवांद्वारे दौंड शहरात सुरु असलेल्या साखळी उपोषण स्थळी नुकतीच भेट देऊन उपस्थित मराठा बांधवांशी संवाद साधला असल्याचे म्हटले आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास मराठा समाजाला प्रगतीचा समसमान संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरक्षण मिळणे आवश्यक असून मराठा समाजाला आर्थिक- सामाजिक मागास गटात स्वतंत्र १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती शासनाने घेतला होता. मुंबई उच्च न्यायालयाने त्यास मंजुरी देखील दिली होतीअसे त्यांनी म्हटले आहे.

तसेच महाविकास आघाडी शासनाने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने हाताळला नाही व दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकू शकले नाही. सर्व कायदेशीर बाबी तपासून टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुती शासन अनुकूल असून शासनस्तरावर याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी नमूद केले आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी आमदार राहुल कुल यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आमदार कुल यांच्याकडूनही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.