पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावर नवले पूल परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आणि रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलाविण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना याबाबत त्यांनी लेखी पत्र दिले आहे. या बैठका नियमित घेऊन रस्ता सुरेक्षेच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात. तसेच त्या त्या वेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकांतील सूचनांनुसार या रस्त्यावर योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात, असे खा. सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. रविवारी (दि. २०) रात्री नवले पूल आणि स्वामीनारायण मंदिर परिसरात दोन मोठे अपघात झाले. त्यानंतर काल (दि. २१) खा. सुप्रिया सुळे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. इतकेच नाही तर या अपघातातील जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांची विचारपूसही केली. त्यानंतर आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मुंबई-बंगळूरू महामार्गावर सातत्याने अपघात होत असून या संदर्भात उपाय योजना करण्यासंदर्भात वेळोवेळी बैठकी द्वारे तसेच पत्रव्यवहार आपण पाठपुरावा केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवले पूल हा अपघातांचा हॉटस्पॉट ठरतआहे. या ठिकाणी वेळोवेळी भेट देऊन आपण पाहणी देखील केली आहे व त्यानुसार बैठकीत सर्व्हिस रस्त्याची कामे करणे, महामार्गावरील पंक्चर बंद करणे, अतिक्रमण काढणे अशा आपत्कालीन उपाययोजनाही सुचविल्या आहेत, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतारावर वेग मर्यादा ८० वरून ४० किलोमीटर प्रति तास करण्यात यावी, तसेच त्याचे फलक लावावेत, स्टड लाईट, ठिकाणी रम्बल स्ट्रीप, सोलर ब्लिकर्स, कर्ब पेंटिंग, ‘ड्रिंक अँड ड्राईव्हला आळा घालणे, गो स्लोव, अपघात प्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा, अशा सूचना देणारे फलक या सारख्या अपघातांवर नियंत्रण करण्यासाठीच्या उपाय योजना तातडीने पूर्ण करण्याबाबत आपण यापूर्वीही मागणी केली होती त्यावरही शीघ्रगतीने कार्यवाही व्हायला हवी, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
या मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेकडे आराखडा सादर केला आहे. अशातच रविवारी झालेल्या भिषण अपघातानंतर जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा आणि अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे तातडीने या उपाययोजना करण्यात याव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.