पावसाळी अधिवेशन
मुंबई : दौंड तालुक्यातील स्वतंत्र उपविभागीय कार्यालय व नवीन जिल्हा न्यायालय सुरु करण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली आहे
यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले कि, दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्यासाठी दि. १८ सप्टेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचनेनुसार मान्यता मिळाली होती, त्यासाठी राजपत्र अधिसूचनेच्या संदर्भ क्र. २ नुसार दि. ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या होत्या. परंतु विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ च्या आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने व सदर आचारसंहिता दि. २७ ऑक्टोबर, २०१९ रोजी संपल्यानंतर हरकती व सूचना घेणेकामी खुपच कमी कालावधी मिळाल्याने तसेच सदर हरकती व सूचना प्राप्त झाल्या नसल्याने स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे.
त्यासाठी राजपत्र अधिसूचना नव्याने प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागवून हे कार्यालय तातडीने सुरु करणे आवश्यक असून हे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्याबाबत राजपत्र अधिसूचना नव्याने प्रसिद्ध करून हे कार्यालय तातडीने सुरु करण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी,
तसेच, दौंड येथे नवीन जिल्हा न्यायालय सुरु करण्याचा प्रस्ताव मा. उच्च नायालयाच्या शिफारशीने मंत्रालयात सादर झालेला असून, सदर प्रस्ताव वित्त विभाग तसेच विधी व न्याय विभागाच्या मान्यतेने उपसमितीच्या बैठकीसाठी सादर करण्यात आला आहे, त्यास देखील मान्यता मिळण्याची आवश्यकता आहे.
याबाबत शासनाने सकारात्मक कार्यवाही करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.