लहरी हवामानाचा द्राक्ष निर्यातीवरही होणार परिणाम ! शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

सुधीर गोखले

सांगली : यंदा झालेला अवकाळी पाऊस आणि काही भागात झालेली गारपीट हि द्राक्ष बागायतदारांच्या मुळावर उठली आहे. याचा परिणाम निर्यातक्षम द्राक्ष बागांवर झाला असून सध्या द्राक्ष बागायतदार वर्गातमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सांगली जिल्हा हा द्राक्ष निर्याती साठी अव्वल समजला जातो.  मात्र निर्यात सुरु होण्यास यंदा दोन आठवडे उशीर लागणार असल्याचे द्राक्ष उत्पादकांकडून बोलले जात आहे.

मिरज पूर्व भागामध्ये खंडेराजुरी, किंवा तासगाव तालुका हा द्राक्ष उत्पादनात अग्रेसर मानला जातो तसेच मोठ्या प्रमाणावर या ठिकाणाहून निर्यातक्षम द्राक्षांची निर्यात आखाती देश आणि युरोपात होत असते मात्र यंदा अवकाळीने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. खंडेराजुरी गावचे प्रगतशील शेतकरी दिनकर भोसले यांनी सहकारनामा प्रतिनिधीशी बोलताना, यंदा आमच्या भागात द्राक्ष पिकांवर अवकाळी पावसाने अवकृपा केली आहे. बागेमध्ये द्राक्षपीक दिसायलाच आहे मात्र सर्व पिकांवर तीलांजली आहे. पावसाने तयार होत असलेल्या बागा गळून पडल्या आहेत आणि त्यात आता धुक्याची चादर पसरत आहे. याचा परिणाम म्हणजे द्राक्ष पिकांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असून या मुळे दुहेरी संकटात आम्ही सापडणार असल्याचे ते म्हणाले.

द्राक्ष निर्यातदारांची नोंदणी मोहीम सुरु
सध्या अवकाळी ने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे जवळजवळ ६० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाल्याचे कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक विवेक कुंभार यांनी सहकारनामा प्रतिनिधिशी बोलताना सांगितले. ते म्हणाले कि, आम्ही द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना निर्यात नोंदणीसाठी आवाहन करत आहोत. येत्या काही दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण होतील. यंदा द्राक्ष निर्यातीवर ३० टक्क्यांपर्यंत घट शक्य आहे मात्र जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीचा आलेख कायम ठेवण्याचे आव्हान राहणार आहे. २०२३-२४ या वर्षासाठी शासनाच्या कृषी विभागाकडून निर्यातीसाठी शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. २०२२ – २३ मध्ये जिल्ह्यातून तब्ब्ल ३१ हजारांच्यावर निर्यातक्षम बागांची नोंद झाली होती हा आकडा पुढे सुरु ठेवण्याचे आव्हान कृषी विभागाकडे राहिल.