अख्तर काझी
दौंड : दौंड -पाटस रोडवर रात्रीच्या वेळेस अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असल्याचे चित्र आहे. दि.13 फेब्रुवारी रोजी रात्री च्या वेळेस याच रस्त्यावर भरधाव वाहनाने दुचाकी स्वारास समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आदर्श अरविंद जगताप (वय 24,रा. संस्कार नगर, दौंड) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सगन फकीरा कांबळे (रा. नवीन गार, दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी अज्ञात वाहन व वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्री १२:०१ वाजण्याच्या सुमारास दौंड- पाटस रोडवरील बेटवाडी भागात घडली. मयत आदर्श आपल्या दुचाकीवरून बेटवाडी रोडने घरी येत असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली, धडकेत आदर्शचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर जखमी आदर्शला मदत न करता अज्ञात वाहन चालक फरार झाला. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.
दौंड-पाटस रोडवर रात्रीच्या वेळेस प्रत्येक वाहन चालक आपले वाहन भरधाव वेगाने दामटत आहेत, दुपारच्या वेळेस सुद्धा या रस्त्यावर वाहने सुसाटच धावत असतात. या रोडवर दुतर्फा हॉटेल्स झालेली आहेत, दोन मोठ्या शाळा सुद्धा याच रोडवर आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. या रस्त्यावरील शाळा परिसरात, मुख्य चौकात गतिरोधक बसवावेत अशी मागणी होत आहे.