सांगलीत भरणार ‘उद्यम सांगली’ प्रदर्शन, पहिलेच औद्योगिक प्रदर्शन असल्याने अनेकांचे लागले लक्ष

सुधीर गोखले

सांगली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि सांगलीतील लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच औद्योगिक विभागाला नवीन ऊर्जा देणारे ‘उद्यम सांगली’ हे राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन या महिन्यातील दि २६ ते २९ नोव्हेंबर रोजी सांगलीमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा सौ नीता केळकर यांनी ‘सहकारनामा’शी बोलताना दिली.

याबाबत अधिक माहिती देताना, त्या म्हणाल्या कि ‘अशा पद्धतीचे प्रथमच प्रदर्शन हे सांगलीमध्ये भरत आहे आणि तेही आमच्या संस्थे मार्फत भरत आहे हि आमच्यासाठी खूप गौरवास्पद बाब आहे. हे प्रदर्शन सांगली मधील नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर भरणार असून या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे हे येणार असून त्यांच्या हस्ते रविवारी दि २६ नोव्हेंबर रोजी या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. सोमवारी दि २७ नोव्हेंबर रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थिती मध्ये रोजगार मेळावा होईल तर मंगळवारी (दि २८ नोव्हेंबर) रोजी राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये  उद्योग परिषदेचे आयोजन केले आहे. तर प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी नवं उद्योजक महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे’. 

सौ केळकर म्हणाल्या कि, ‘या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचा मुख्य हेतू हा कि, संपूर्ण राज्याला सांगली जिल्ह्यातील दुग्ध, कापड, साखर, विद्युत निर्मिती उपकरणे आदी व्यवसायाबरोबरच खास करून संरक्षण दलासाठी निर्माण होणाऱ्या उपकरणांची निर्मिती औषध निर्माण आणि इतर निर्यातक्षम उत्पादनांची माहिती व्हावी हा आहे आणि या प्रदर्शनाच्या निमित्ताने सांगलीमध्ये राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून विद्यार्थी नवीन उद्योजक आणि निर्माते भेट देतील त्यामुळे येथील अनेक प्रकारच्या उद्योगांना  नवसंजीवनी मिळण्याबरोबरच नवीन वितरक हि मिळतील. या प्रदर्शनाच्या निमित्ताने मंत्री महोदय येणार असल्याने उद्योजकांना त्यांचे प्रश्नही मंत्र्यांसमोर मांडता येणार आहेत.