दोन मजली इमारत ‘कोसळून’ 5 जणांचा जागीच ‘मृत्यू’

अमरावती : अमरावती येथे एक जुनी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून, 2 जण जखमी झाले आहेत. इमारतीचा मलबा हटविण्याचे काम सध्या सुरु असून यात अजून कोणी दबले आहे का याचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार
अमरावती शहरातअसणाऱ्या प्रभात टॉकीजजवळ ही दोन मजली जुनी इमारत होती. ही इमारत जुनी झाल्याने संबंधितांना महानगरपालिकेकडून अनेकदा नोटीसही बजावण्यात आली होती. ही इमारत जुनी असूनही तिच्या खालच्या मजल्यावर 3 ते 4 दुकाने चालू ठेवण्यात आली होती. ही जीर्ण झालेली इमारत कोसळण्याचा धोका असल्याने महानगरपालिकेने यापूर्वीच इमारत रिकामी करण्याची नोटीस दिली होती मात्र तरीही या इमारतीमध्ये दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ही कामे सुरु असतानाच दुपारच्या वेळी ही इमारत अचानकपणे कोसळल्याने यात काम करणारे काही कर्मचारी व इतर अश्या पाच जणांचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजन गंभीर जखमी झाले.

घटना घडताच पोलिस, स्थानिक अग्निशमन दल आणि पालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य तातडीने सुरू केले. यावेळी पाच जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नोटीस बजावूनही हलगर्जी पणा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती मिळत असून या संपूर्ण प्रकरणाची महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन चौकशी करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मृतांना 5 लाखांची मदत, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

जिल्हाधिकार्‍यांशी मी संपर्कात आहे.
या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.
या घटनेत प्राण गमवावे लागलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सारे सहभागी आहोत.
मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतला आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.