शिवाजी महाराज रस्त्याबाबत खासदार, आमदारांच्या बैठका ! दोघांची परस्पविरोधी भुमिका, मिरज सुधार समितीची जोरदार टीका

सुधीर गोखले

सांगली : मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यांबाबत खासदार संजय पाटील मिरजेत पत्रकार परिषद घेत भूसंपादनासाठी लागणाऱ्या 11 कोटींच्या निधीसाठी थेट केंद्रिय अर्थसंकल्पाचा पर्याय सुचवतात. तर, मिरजेचे आमदार व पालकमंत्री सुरेश खाडे हे ऑक्टोबरपर्यंंत काम पुर्ण करण्याची घोषणा करतात. शिवाजी रस्त्याबाबत एकाच पक्षाच्या खासदार-आमदारांमध्ये समन्वय नसल्याने अंदाजपत्रकाप्रमाणे 22 मीटर होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे, अशी संतप्त टीका मिरज सुधार समितीने केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी 34 मिळकत बाधित होणार आहे. त्यासाठी सुमारे 10 कोटी 65 लाख रूपये नुकसान भरपाईवरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेमध्ये समन्वय नसल्याचे दिसत आहे. रविवारी मिरज मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकार्‍यांची बैठक घेतली. बैठकीत राष्ट्रीय महामार्ग अधिकार्‍यांनी स्पष्ट केले की, अंदाजपत्रकाप्रमाणे 22 मीटर रस्ता होण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, नुकसान भरपाई देण्याबाबत महापालिकेने असमर्थता दर्शविली. तरीही, ऑक्टोबरपर्यंत काम पुर्ण होणार असल्याचे पालकमंत्री सांगतात.

भूसंपादनाशिवाय हा रस्ता ऑक्टोबरपर्यंंत कसा पुर्ण होणार? याबाबत पालकमंत्री स्पष्टपणे बोलत नाही. तर, त्याच दिवशी खासदार संजयकाका पाटील हे मिरजेत पत्रकार परिषद घेत छत्रपती शिवाजी महाराज रस्ता भूसंपादनाच्या निधीसाठी केंंद्रिय बजेटमध्ये तरतूद करावी लागणार असल्याचे सांगतात. केंद्रात सत्त्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींना केवळ 11 कोटींच्या निधीसाठी केंंद्राच्या बजेटची वाट पहावी लागत असेल तर, मिरजकरांची या पेक्षा आणखीन काय दुर्दैव्य असणार आहे? अशी संतप्त टिकाही मिरज सुधार समितीने केली आहे.

दोघा जबाबदार लोकप्रतिनिधींनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून या रस्त्याचा विषय मार्गी लावावा, अशी मागणी मिरज सुधार समितीने केली आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, कार्यवाह जहीर मुजावर, उपाध्यक्ष राकेश तामगावे, संतोष जेडगे, अक्षय वाघमारे आदी उपस्थित होते.