दौंड : दौंड-गोपाळवाडी रोड परिसरातील शिवराज नगर येथील रुद्र गंगा अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या दोन कुटुंबातील भांडणाने जातीय वळण घेतल्याची घटना घडली आहे.
दौंड पोलिसात झालेल्या परस्पर विरोधी तक्रारींमुळे एका कुटुंबावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दौंड पोलिसांनी याप्रकरणी तब्बल 15 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
मालन उत्तम खंडे(रा. शिवराज नगर, दौंड) यांच्या फिर्यादीवरून संजय लोंढे, तेजस संजय लोंढे, प्रतीक संजय लोंढे, अनुराग गोयेकर, वैष्णवी गोयकर, मनीषा संजय लोंढे, सागर लोंढे(सर्व रा. शिवराज नगर, दौंड), विशाल महामुनी, भैय्या (पूर्ण नाव माहित नाही,रा. गोपाळवाडी, दौंड) यांच्याविरोधात मारहाण व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर मनीषा संजय लोंढे यांच्या फिर्यादीवरून मालन उत्तम खंडे, करण उत्तम खंडे, विश्वास कांबळे, वैभव जाधव, रीमा विश्वास कांबळे ,काजल वैभव जाधव (सर्व रा. शिवराज नगर, दौंड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दिनांक 12 एप्रिल रोजी रात्री 10 वा. दरम्यान शिवराज नगर येथील रुद्रगंगा अपार्टमेंट इमारती मध्ये राहणाऱ्या खंडे व लोंढे कुटुंबीयांमध्ये शुल्लक कारणावरून मारहाणीची घटना झाली.
याप्रकरणी मालन उत्तम खंडे यांनी पोलिसांकडे अशी तक्रार दिली की, संजय लोंढे व इतरांनी फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ व भाषा वापरून, आम्ही या इमारतीमध्ये वीस लाख रुपये खर्च करून फ्लॅट विकत घेतले आहेत मात्र या ठिकाणी भाडेकरूच रुबाब करतात असे म्हणत भांडणाला सुरुवात केली. नंतर या सर्व आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून कुटुंबांमधील महिलांना पाईपने मारहाण केली. खंडे यांच्या फिर्यादीवरून संजय लोंढे व इतर आठ जणांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर परस्पर विरोधी तक्रार करताना मनीषा लोंढे यांनी खंडे कुटुंबीयां विरोधात असे आरोप केले आहे की, मालन उत्तम खंडे व त्यांच्या इतर साथीदारांनी फिर्यादी यांच्या पतीला व मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व बाहेरून मुले आणून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच जर आमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली तर तुमच्याविरुद्ध ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून तुमच्या घरदाराला दानाला लावतो अशी धमकीही फिर्यादी यांच्या कुटुंबियांना देण्यात आली, भांडणा दरम्यान रीमा कांबळे हिने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरून नेले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दौंड पोलिसांनी मालन खंडे व इतर 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.