भिगवण : स्वभावाने गरीब असणाऱ्या प्राण्यांमध्ये ज्या प्राण्याचा आवर्जून उल्लेख तो म्हणजे ‛शेळी,’ मात्र याच गरीब प्राण्यामुळे कधी कधी चांगलाच उद्योग होऊन बसतो. आता हेच पहा ना केवळ शेळी बांधावर नेताना शेतात जाण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबात चांगलीच हाणामारी झाली आहे. या हाणामारीत दोन्ही बाजूच्या सात लोकांवर वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर घडले असे की इंदापूर तालुक्यातील निरवांगी येथे शेळ्या घरी घेऊन जात असताना एक शेळी शेजारील बांधकऱ्याच्या शेतात गेली. या कारणामुळे शेजारील बांधकारी आणि शेळी मालक यांच्यात अगोदर बाचाबाची झाली आणि नंतर त्याचे पर्यावसन चक्क तुंबळ हाणामारीत झाले. हि हाणामारी नुसती हातानेच न होता यात काठ्या आणि लाकडी दांडक्यांचाही वापर करण्यात आला.
या हाणामारीची सोपान हनुमंत निगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बबन सिताराम रासकर, पोपट सिताराम रासकर, दीपक पोपट रासकर व त्यांचा मुलगा ( सर्व रा.निरवांगी, ता.इंदापूर) अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला तर फिर्यादी बबन सिताराम रासकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोपान हनुमंत निगडे, हनुमंत पांडुरंग निगडे व नंदकुमार वामन निगडे (सर्व.रा. दगडवाडी, निगडे वस्ती ता.इंदापूर) या तिघांवरही वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ एका शेळीच्या शेतात जाण्यावरून दोन कुटुंबात इतक्या मोठ्याप्रमाणात हाणामारी व्हावी हि बाब निश्चितच आत्मपरीक्षण करण्याजोगी आहे.