केडगाव येथे हायवा ट्रक ने दोघांना चिरडले | एक ठार, एक गंभीर

केडगाव (दौंड) : केडगाव येथील रेल्वे पुलाजवळ असणाऱ्या मुक्तीमिशन समोर  भरधाव हायवा ट्रक ने इतर वाहणास ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवरील दोघांना चिरडल्याने त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या इसमाला गंभीर दुखापत झाल्याने त्यास तातडीने पुण्याजवळील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

शंकर रघुनाथ पाडुळे (वय 45, रा.गणेशवाडी, ता.कर्जत जि.अहिल्यानगर) असे या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव असून हनुमंत नारायण कोपनर (वय 35, रा.राक्षवाडी, ता.कर्जत जि.अहिल्यानगर) असे गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे याबाबत मयताचे बंधू युवराज रघुनाथ पाडुळे (वय 40, व्यवसाय – शेती रा.गणेशवाडी, ता.कर्जत जि.अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिपार्धी येथील यात्रेनिमित्त वरील दोघेजन त्यांचे पाहुणे सुनिल खामगळ यांच्याकडे जेवण्यास आले होते. दुपारी जेवण आटोपल्यानंतर ते गांढळवाडी येथील त्यांची आत्या अनुसया बापूराव हंडाळ यांना भेटायला निघाले होते. हे दोघेजन केडगाव येथील रमाबाई मुक्ती मिशन जवळ असणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलावरून जात असताना समोरून भरधावपणे आलेल्या हायवा ट्रक क्र. MH-12-SE-2428 याने जोरदार धडक दिल्याने यात शंकर पाडुळे यांचा जागीच मृत्यू झाला तर हनुमंत कोपनर हे बेशुद्ध होते.

स्थानिकांनी या दोघांना तातडीने डॉ.विशाल खळदकर यांच्या निरामय हॉस्पिटल येथे घेऊन गेले असता त्यांनी शंकर पाडुळे यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले तर हनुमंत कोपनर यांनाही जबर दुखापत होऊन ते बेशुद्ध असल्याने पुढील उपचाराकामी लोणीकाळभोर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. या अपघतानंतर ट्रक चालक पसार झाला असून केडगाव / यवत पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे हे करीत आहेत.