दौंड : दौंड तालुक्यात बिबट्याने थैमान घातले आहे. कुठे न कुठे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांची जनावरे मरत आहेत मात्र हे सर्व होत असताना सकाळी झालेल्या घटनेची माहिती देऊनही सायंकाळपर्यंत घटनास्थळी पोहचू न शकणारे वन अधिकारी आणि कर्मचारी नेमके कुठे आहेत हेच शेतकऱ्यांना समजत नाहीये.
केडगाव गावातील ननवरे यांच्या शेतामध्ये त्यांची दोन वासरे चरत असताना अचानकपणे त्या ठिकाणी बिबट्या सदृश प्राण्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवे मारले अशी माहिती शेतकरी ननवरे यांनी दिली आहे. सकाळी ही घटना घडल्यानंतर त्यांनी वरवंड येथे ऑफिसमध्ये असणाऱ्या वन अधिकाऱ्यांना अनेकवेळा फोन लावला मात्र त्यांचा फोन सारखा सारखा बिझी लागत होता.
त्यामुळे ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास केडगाव येथून वरवंड येथील वन विभागाच्या कार्यालयात पोहोचले मात्र तेथे कुणीही नव्हते त्यामुळे त्यांनी पुन्हा पुन्हा वन अधिकाऱ्यांना फोन लावत राहिले, अखेर काही वेळाने त्यांचा आणि वन अधिकाऱ्यांचा फोन झाला आणि त्यांनी आपल्या वासरांसोबत जे घडले ते सांगितले. यावेळी वन अधिकाऱ्यांनी आम्ही कामात आहोत, माणसे पाठवते तुम्ही शेतातच थांबा असे सांगितले.
सकाळी घटना घडल्यानंतर या शेतकऱ्याने वन अधिकाऱ्यांना फोन करून, कार्यालयात जाऊनसुद्धा सायंकाळी ०६ वाजेपर्यंत त्यांच्या शेताकडे वन विभागाचे कोणीही फिरकलेले नाही. तुम्ही शेतात थांबा आम्ही येतोय हे सांगून तीन चार तास झाले, त्यानंतर पाऊस येउन हे शेतकरी पावसात भिजले मात्र अजूनही तेथे कोणी आले नाही त्यामुळे या खात्याची सेवा किती तत्पर आहे याची आज मोठी प्रचिती आल्याचे शेतकरी सांगत आहे.