दौंड : दौंडजवळ कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या दोन दरोडेखोरांना लोहमार्ग पोलिसांनी अटक करून त्यांच्याजवळून लुटीतील मुद्देमाल जप्त केला आहे.
कुंजीऱ्या अहिर्या पवार (रा. खडकी ता. दौंड) व दीपक चंद्रकांत मुंगळे (रा. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना दौंड लोहमार्ग पोलिसांनी खडकी येथून अटक केली आहे. दि.26 ऑक्टोबर रोजी पुणे-दौंड लोहमार्गावरील नानवीज जवळ रेल्वे सिग्नल बंद पाडून कोणार्क एक्सप्रेस थांबविण्यात आली होती.
यावेळी या दरोडेखोरांनी रेल्वेतील प्रवासी मिनाक्षी गायकवाड ( रा. रामवाडी, सोलापूर) व कल्पना विनायक श्रीराम (रा. सोलापूर) या दोन महिलांच्या गळ्यातील दीड लाखांचे सोन्याचे दागिने लूटले होते. यावेळी चोरट्यांचा प्रतिकार करणाऱ्या राकेश गायकवाड (रा.सोलापूर) यांना या दरोडेखोरांनी दगडांचा मारा करून गंभीर जखमी केले होते. लोहमार्ग पोलिसांनी गुप्तपणे तपास करून शिताफीने आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास दौंड लोहमार्ग पोलीस करत आहेत.