Tula Pahte Re – तुला पाहते रे फेम अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न, जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक



मुंबई – सहकारनामा 

अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै हे दि. ६ जानेवारी रोजी मुंबई येथील अथेना बँकवेट येथे विवाहबंधनात अडकले. 

तष्ट वेडिंग हाऊसने डिजाइन केलेल्या भरजरी आणि हस्तरचीत कपड्यांमध्ये लग्नात मुख्य आकर्षण असलेले ते दोघेही अधिक खुलून दिसत होते. या मंगलमय सोहळ्याच्या नाजूक क्षणांची छायाचित्रे गिरीष काटकर, तष्ट फोटोग्राफी, ऋषिकेश जगलपुरे आणि टीमने टिपून या सोहळ्याला चारचांद लावले.

बऱ्याच सेलिब्रिटिंनी या भव्य महाराष्ट्रीयन विवाह सोहळ्याला हजेरी लावून या जोडप्याला आशीर्वाद दिले. यातील अनेक सेलिब्रिटींनी रॉयल तष्टचे कपडे परिधान केले होते. लग्नाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाने विवाहित जोडप्याच्या ड्रेसचे भरभरून कौतुक केले. रॉयल तष्टने डिजाइन केलेल्या कपड्यांची खासियत म्हणजे लग्नासाठी नवदाम्पत्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले अनुभव कपड्यांवरील नक्षीकामातून दर्शवण्यात आले होते. त्यामुळे अभिनेत्री अभिज्ञा भावेचा हा विवाह सोहळा परंपरा जपून भावनांना व्यक्त करणारा होता. 

लग्न विधीसाठी परंपरेचे पावित्र्य अधोरेखित करत अभिनेत्री अभिज्ञा भावेने तष्ट हाऊसने डिझाईन केलेली कमळाचे नक्षीकाम असलेली भरजरी हँडवर्क सिल्क साडी नेसली होती. तर नवरदेव मेहुल पैने अभिज्ञाच्या सिल्क साडीला शोभेल असा अंगरखा घालून त्यावर निळा शेला आणि फ्लोरल ऑर्गांझा कपड्याचा फेटा परिधान केला होता.  या लक्ष्मी नारायणाच्या जोडीचे कौतुक तर झालेच पण त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांनी त्यांना अधिक आकर्षक बनवले.

सकाळच्या वेळेत लग्न विधी पार पडल्यानंतर रिसेप्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नववधूने हाताने तयार केलेला ब्लाऊज आणि बनारसी सोनेरी साडी नेसली होती. नवरदेवाने राजेशाही थाटात पेहराव करून त्यावर जदौ मोत्याच्या माळा घातल्या होत्या. 

 या दर्जेदार रॉयल विवाह सोहळा आणि रिसेप्शननंतर आता त्यांच्या पोस्ट वेडिंगची उत्सुकता उपस्थित पाहुणे मंडळीना लागली आहे.