दौंड मधील राज्य राखीव पोलिसांच्या वतीने शहीद शूरवीरांना मानवंदना

अख्तर काझी

दौंड : मेरी माटी, मेरा देश… मिट्टी को नमन, विरोंको वंदन… अश्या शब्दांमध्ये दौंड मधील राज्य राखीव पोलीस दलाच्या (बल गट क्र.7) वतीने नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांना वंदन करण्यात आले.

दि.5 ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कसनसुर या नक्षलग्रस्त भागामध्ये आपले कर्तव्य बजावत असताना, नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भु सुरुंगाच्या स्फोटादरम्यान नक्षलवाद्यांशी झुंज देताना येथील राज्य राखीव पोलीस दलातील शूर जवान बि.डी. हरिदास, एम. के .वाळके व एस .एस. मिसाळ हे शहीद झाले. वीरमरण आलेल्या या शूर वीरांना नमन करण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने शहरातून मोटर सायकल रॅली काढण्यात आली.

यामध्ये बल गट क्र. 7 मधील जवानांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी शहरातील राष्ट्रपुरुषांच्या स्मारकासमोर तसेच संविधान स्तंभासमोर पोलीस पथकाच्या बँड पथकाने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. दौंडकरही या शूर वीरांना मानवंदना देण्यासाठी यावेळी सहभागी झाले होते. शहरातून रॅली मार्गस्थ होत असताना शालेय विद्यार्थी भारत माता की जय असा जयघोष करीत होते.