वरवंड ग्रामपंचायत समोरील पक्षांचा किलबिलाट कायमचा थांबला.. झाड तोडले, घरटी तुटली, पक्षी मेले अण प्राणी मित्र गहिवरले

वरवंड, दौंड : सरकार म्हणते झाडे लावा, झाडे जगवा.. मात्र कोणतीही परवानगी न घेता अनेक ठिकाणी झाडांची कत्तल केली जाते. सरकार म्हणते पक्षी जगवा, त्यांचे रक्षण करा मात्र येथे पक्षी राहत असलेली घरटी तोडून त्यातील काही पक्षांच्या लहान पिल्लांचा मृत्यू होतो आणि हे सर्व पाहून प्राणी मित्र मात्र गहिवरून जातात.

आज बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी सुद्धा वरवंड ग्रामपंचायत कार्यालयासमोर असेच काहीसे घडले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर असणारे 15 ते 20 वर्षांपूर्वीच्या पिपरन वृक्षाची कत्तल करण्यात आली. या वृक्षावर 50 ते 60 पक्षांची घरटी होती. त्यात जास्त करून बगळा या पक्षांची मोठ्या प्रमाणावर घरटी होती. काही घरट्यांमध्ये नुकतीच बगळ्यांची जन्मलेली पिल्ले होती तर अनेक घरट्यांमध्ये पक्षांची अंडी होती.

ग्रामपंचायत समोरील झाड तोडल्यानंतर यातील घरटी खाली पडून त्यातील काही पिल्ले मरण पावली, पक्षी उबवत असलेली अंडी फुटली तर काही जिवंत असलेली पिल्ले वरवंड स्मशानभूमी या ठिकाणी ग्रामपंचायत शिपायाच्या मार्फत फेकून देण्यात आली असा काहीसा हा प्रकार आज घडला आहे. या सर्व प्रकाराने प्राणी मित्र कमालीचे संतप्त झाले आहेत. लहान पक्षांची दुर्दैवी अवस्था पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. झाड तोडण्या अगोदर त्या पक्षांचा विचार करायला हवा होता, शेवटी ते मुके पक्षी आपल्या पिल्लांच्या झालेल्या मृत्युंवर आर्त किंकाळ्यांशिवाय काहीच करू शकत नाहीत हे सर्वांना माहित आहे. मात्र कोणतीही कृती करताना निसर्गाचा विचार होणे गरजेचे आहे अन्यथा आपले मानव जातीचे सुद्धा त्यापेक्षा भयानक हाल होऊ शकतात हेही तितकेच सत्य आहे.

वरवंड ग्रामपंचायत समोरील वृक्षावर ‘बगळा ’ जातीच्या पक्षांची घरटी असताना व त्या घरट्यांमध्ये पिल्ले आणि अंडी असताना ते झाड तोडणे योग्य नव्हते. झाड तोडल्यामुळे अनेक पिल्लांचा पडून मृत्यू झाला आहे, पक्षी उबवत असलेली अंडी फुटली आहेत. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.

अहिरेश्वर जगताप
मानद प्राणी कल्याण अधिकारी