दौंड शहरातील वाहतूक समस्या आणि चार चाकी वाहन पार्किंगचा विषय बनला गंभीर.. मुख्य बाजारपेठेवर होत आहे परिणाम

दौंड (अख्तर काझी) : शहरातील वाहतूक समस्या व चार चाकी गाड्यांच्या पार्किंगचा विषय गंभीर बनत असल्याचे सध्या चित्र आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये चार चाकी गाड्या लावण्यासाठी रस्त्यावर इंचभर जागाही मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी व इतर कामांसाठी चार चाकी गाड्यांमधून आलेल्यांना मोठ्या त्रासाला तसेच पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सुद्धा सामोरे जावे लागत आहे.

विशेषतः महात्मा गांधी चौकातील अवस्था तर अधिकच बिकट झाली आहे. या ठिकाणी चार चाकी गाड्या पार्किंग करणे तसेच रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांसाठी नगरपालिकेने जागा निश्चित करून दिली आहे. मात्र चार चाकी गाड्यांच्या पार्किंगची जागा येथील हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांनी ती बळकाविली असल्याचे पाहायला मिळते. गांधी चौक परिसरामध्ये दोन दवाखाने, बँक , हॉटेल आहे, या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना, ग्राहकांना आपल्या गाड्या लावण्यासाठी जागाच शिल्लक मिळत नाही. अशा परिस्थितीमध्येही एखाद्या मोकळ्या जागेवर जर एखाद्याने आपली गाडी लावलीच तर तेथील हातगाड्यांवर व्यवसाय करणारे त्यांच्याशी वाद घालतात, अरेरावीची भाषा करतात.

येथील एखाद्या दुकानातून खरेदी करण्यासाठी जर ग्राहकाने आपली गाडी पाच मिनिटांसाठी जरी रस्त्यावर उभी केली तरी त्याला पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे व आर्थिक भ्रूदंड सोसावा लागत आहे. शहरातील या समस्यांमुळे ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे, ज्याचा येथील बाजारपेठेवर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.
नुकतेच गांधी चौकातील व्यापारी वर्गाने नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना या समस्यांबाबत व तोडगा काढण्याबाबत निवेदन दिलेले आहे. निवेदनात असे नमूद केले आहे की, शहरात दुचाकी, चारचाकी पार्किंगची समस्या वाढली आहे. नागरिकांच्या मोठ्या मागणीनंतर नगरपालिकेने शहरातील काही ठिकाणी दुचाकी पार्किंगची सोय उपलब्ध करून दिली आहे. परंतु महात्मा गांधी चौकात मात्र पार्किंगची व्यवस्थाच उपलब्ध नाही.

मूळ गावठाणातील गांधी चौकात दैनंदिन गरजेच्या वस्तू ,फळे ,भाजीपाला, शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते. या चौकातील सराफ पेढीमध्ये तालुक्यातून ग्राहक येत असतात. या ग्राहकांना आपली दुचाकी, चारचाकी गाडी नेमकी कोठे लावावी हा प्रश्न पडतो. त्यामुळे ग्राहक गांधी चौकात खरेदी करण्यासाठी नाखुश असतात, या चौकामध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे. त्याचा परिणाम व्यापार पेठेवर होत असून व्यापारी वर्गावर आर्थिक संकट ओढवत आहे. नगरपालिकेने गांधी चौक परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी व्यापारी वर्गाने निवेदनाद्वारे केली आहे.