अख्तर काझी
दौंड : दौंड शहरातील एक व्यापारी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. हे व्यापारी दौंड मधील खाजगी सावकारांच्या दमदाटीला व जाचाला कंटाळून घर सोडून निघून गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीच्या बोलण्यातून येत असल्याने या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे.
समीर कादर शेख (वय 44,रा. नटराज कॉलनी तुकाई नगर दौंड) असे बेपत्ता झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. समीर शेख यांचे समीर इंटरप्राईजेस नावाने दौंड शहरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीचे दुकान आहे. दि. 20 ऑगस्ट 2022 रोजी, पहाटेच्या नमाजला जात आहे असे सांगून समीर शेख हे घरातून बाहेर पडले, दुपारपर्यंत ते घरी न आल्याने त्यांच्या नातलगांनी त्यांचा शोध घेतला परंतु शहरात कोठेही त्यांचा संपर्क झाला नाही. म्हणून समीर शेख यांच्या पत्नीने त्यांचे पती बेपत्ता झाले असल्याची माहिती दौंड पोलिसांना दिली.
तसेच शहरातील काही खाजगी सावकारांकडून समीर यांनी व्याजाने पैसे घेतलेले आहेत, यापैकी काही खाजगी सावकारांनी समीर यांना एक-दोन दिवसापूर्वीच पैशासाठी दमदाटी केली होती त्यामुळे ते मानसिक तणावातच होते. या खाजगी सावकारांच्या दमदाटीला घाबरूनच समीर हे घर सोडून गेले आहेत अशी माहितीही समीर यांच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे, तसेच दमदाटी करणाऱ्या सावकारांची नावे ही पोलिसांना दिली आहेत,अशी माहिती समीर यांचे बंधू जमीर शेख यांनी ‘सहकारनामा’शी बोलताना दिली आहे.
माझ्या पतीचे काही बरे वाईट झाल्यास या खाजगी सावकारांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी समीर यांच्या पत्नीने दौंड पोलिसांकडे केली असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. समीर शेख यांच्या पत्नीने दिलेल्या अधिक माहितीवरून दौंड पोलिसांनी तपास सुरू केला आहे.