दरोडा टाकण्यासाठी अगोदर ज्योतीषाकडून मुहुर्त काढला नंतर महिलेचे हातपाय बांधून मारहाण करत एक कोटी रूपयांचा ऐवजही चोरून नेला, मात्र बारामती पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि दरोडेखोरांसह ज्योतिषही जेरबंद झाला

पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात एक गंभीर पण तितकीच आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. दरोडा टाकण्यासाठी दरोडेखोरांनी आगोदर ज्योतीषाकडून मुहुर्त काढला नंतर महिलेचे हातपाय बांधून तिला मारहाण केली आणि नंतर रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यासह सुमारे एक कोटी रूपयांचा ऐवज चोरून नेला मात्र या दरोडेखोरांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्तपणे मागमूस काढत अखेर या टोळीतील 5 जणांना जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील देवकाते नगर येथे सागर शिवाजी गोफणे हे त्यांची पत्नी सौ तृप्ती सागर गोफणे असे दोन मुलांसह राहत आहेत. दि २१/०४/२०२३ रोजी सागर गोफणे हे तिरूपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्या दिवशी रात्री ८ च्या सुमारास तृप्ती सागर गोफणे या त्यांच्या लहान मुलासह घरी असताना चार अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कंपाउंड भिंतीवरून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी तृप्ती गोफणे यांना मारहाण करून हातपाय बांधत तोंडात कापडाचा बोळा कोंबूला. आणि घरातील रोख रक्कम ९५ लाख ३० हजार रूपये व सुमारे २० तोळे वजनाचे ११ लाख ५९ हजार ३०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि ३५ हजार रूपयांचे तीन मोबाईल असा एकूण १ कोटी ७ लाख २४ हजार ३०० रूपये किंमतीचा ऐवज जबरीने चोरून नेला होता.

या घटनेनंतर सौ.तृप्ती सागर गोफणे यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बारामती शहरात लोक वस्तीत रहदारीचे वेळी घटना घडल्याने परीसरात व बारामती शहरात खळबळ उडाली होती. गुन्हयाची व्याप्ती व गांर्भीय मोठे होते. घटनेचा प्रकार पाहता, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, श्री सुनिल फुलारी साो. कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व सुचना केल्या. मा. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल साो. पुणे ग्रामीण यांनी गुन्हयांचे स्थानिक गुन्हे शाखेची तपास पथके नेमून गुन्हयाचे अनुषंगाने सीसीटीव्ही, गोपनीय बातमीदार, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेवून गुन्हा उघडकीस आणणे कामी योजना तयार करून मार्गदर्शन केले आणि दर आठवड्याला सदर गुन्ह्याचे बाबत मागोवा घेतला.

गुन्हा करणाऱ्या आरोपींनी आपण पकडले जावू नये याकरीता सर्वोतोपरी काळजी घेवून कोणताही मागमूस ठेवला नव्हता. नेमलेल्या तपास पथकाने सीसीटीव्ही चे प्राप्त फुटेज मधील आरोपींचे वर्णन, पेहराव असे बारकावे तपासून गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारावर गुन्हयाची उकल केली आणि गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.
गुन्हयातील आरोपी हे एमआयडीसीतील मजुर कामगार असल्याची माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष केंद्रीत केले आणि त्यांची खात्री झाल्यानंतर आरोपी १ ) सचिन अशोक जगधने, (वय ३० वर्षे, व्यवसाय नोकरी,
रा. गुणवडी, २९ फाटा, जि.प. शाळेजवळ, ता. बारामती, जि पुणे) २) रायबा तानाजी चव्हाण, (वय ३२ वर्षे, व्यवसाय चालक, रा.
शेटफळ हवेली, जाधववस्ती, कॅनॉलजवळ, ता. इंदापूर, जि. पुणे) ३) रविंद्र शिवाजी भोसले, (वय २७ वर्षे, व्यवसाय नोकरी/शेतमजुरी, रा. निरा वागज, घाडगेवाडी रोड, भोसलेवस्ती, पाण्याचे टाकीजवळ, ता. बारामती, जि. पुणे) ४) दुर्योधन ऊर्फ
दिपक ऊर्फ पप्पु धनाजी जाधव, (वय ३५ वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. जिंती, हायस्कुलचे जवळ ता. फलटण, जि. सातारा)
५) नितीन अर्जुन मोरे, (वय ३६ वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. धर्मपुरी, ता. माळशीरस, जि सोलापूर) यांना स्थानिक गुन्हे
शाखेच्या वेगवेगळया पथकाने बारामती तालुका परीसर, मेखळी, अशा वेगवेगळ्या परीसरातून ताब्यात घेवून चौकशी केली
असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

सागर गोफणे हा जमीन खरेदी विक्री चा व्यवसाय करत असून त्याच्याजवळ भरपूर
पैसे असलेबाबत माहिती आरोपी सचिन जगधने यास मिळाली होती, त्याने गुन्ह्याचा कट रचला. सदरचा गुन्हा करण्यापूर्वी
आरोपींनी आरोपी रामचंद्र वामन चव्हाण (वय ४३ वर्षे, व्यवसाय शेती, ज्योतीष, मुळ रा. आंदरूड ता. फलटण जि.सातारा सध्या रा. वडुज, पेडगाव रोड, प्रतिक ढाब्या जवळ, गुरुकृपा अपार्टमेंट, दुसरा मजला, ता. खटाव जि सातारा) या ज्योतीषशास्त्र पाहणाऱ्या आरोपीस कटात सामील करून घेवून त्याचेकडून गुन्हा करणेसाठी मुहूर्त काढून त्याचे मार्गदर्शनाखाली गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या आरोपीस देखील अटक केली. गुन्हयास कट रचून दरोडा टाकल्याची कलमे वाढविली आहेत.
आरोपींकडून पंचनाम्याने आत्तापर्यंत एकूण ७६ लाख ३२ हजार ४९० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यामध्ये ६० लाख ९७ हजार रुपये रोख रक्कम व १५ लाख ३५ हजार ४९० रूपये किंमतीचे २६ तोळे वजनाचे हस्तगत करण्यात आले आहेत.