कुरकुंभ : येडेश्वरी येथुन देवदर्शन करुन पुणे सोलापूर हायवेने पुण्याला जात असताना तीन अज्ञात इसमांनी दोन पुरुष आणि एका महिलेला लोखंडी गजाने मारहाण करुन पिस्तूलाचा धाक दाखवून सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना दि.२६ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता कुरकुंभ परिसरात घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप सुखदेव धोत्रे (राहुलनगर, निगडी,पुणे) हे त्यांचे मावसभाऊ मयुर रवींद्र काकडे आणि मावशी सपना यांसोबत येडेश्वरी येथे देवदर्शन करुन पुणे सोलापूर हायवे मार्गे पुण्याला जात असताना कुरकुंभ येथे पहाटे ३ वाजता आल्यानंतर विश्रांतीसाठी ते त्यांची टोयोटा रोमीऑन गाडी हे रस्त्याच्या कडेला घेऊन झोपले होते.

यावेळी त्या ठिकाणी अनोळखी तीन इसमांनी येउन लोखंडी रॉडने गाडीची काच फोडुन फिर्यादी प्रदीप धोत्रे, मावस भाउ मयुर काकडे व मावशी सपना यांना लोखंडी रॉडने मारहाण करुन त्यांची मावशी सपना हिला बंदुकीचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी देवुन तिच्या अंगावरील सोन्याचे दागीने जबरदस्तीने काढून घेत मोटारसायकलवर निघुन गेले.
सदर घटनेची माहिती फिर्यादी यांनी दौंड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई शिंदे करीत आहेत.







