दौंड : गेल्या काही महिन्यांमध्ये केडगाव (ता. दौंड) येथील रमाबाई मुक्ती मिशनच्या कारभारावर मोठी टिका करण्यात आली होती. मुक्ती मिशनमध्ये इतर धर्मीय मुलांचे धर्म परिवर्तन केले जाते असा आरोप काही राजकीय नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. तसेच त्यांनी केलेल्या आरोपांच्या व्हिडीओ क्लिपही सोशल मिडियावर फिरत होत्या. या सर्व प्रकारानंतर आता पास्टर वेल्फेअर असोसिएशन आणि ख्रिस्ती समाजबांधवांकडून दौंड पोलीस ठाण्याच्या आवारात निषेध सभा घेण्यात येऊन या आरोपांबाबत दौंड पोलिसांना एक निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात रमाबाई मुक्ती मिशनची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून रमाबाई मुक्ती मिशन काय आहे आणि त्यांचे कार्य कसे आहे याची माहितीही देण्यात आली आहे.
ख्रिस्ती समाजाचे निवेदन उपरोक्त विषयी ख्रिस्ती समाजाकडून निवेदन देण्यात आले आहे ज्यामध्ये, मागील काही दिवसात केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्तीमिशनच्या संबंधी काही संघटनांचे व राजकीय पक्षाचे नेत्यांनी या संस्थेविरुध्द, ख्रिस्ती धर्माविरोधात व्हीडीओ क्लिप व्हॉयरल केल्या आहेत. अर्थातच हे व्हीडीओ अर्धवट माहितीवर आधारीत होते व ख्रिश्चन धर्माबद्दल द्वेष व तेढ निर्माणकरण्याच्या हेतुने केले होते हे निदर्शनास येते. ख्रिश्चन धर्मातर्फे चालविलेल्या शैक्षणिक संस्था व अनाथाश्रम यांच्यावर धर्मांतराचे बिनबुडाचे आरोप वारंवार केले जात आहेत. बळजबरीने धर्मांतर केले जाते व बाप्तीस्मा दिला जातो, चर्चमध्ये वाईन व पाव दिला की संबंधित व्यक्तीचे धर्म परिवर्तन होते असे राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी सारख्या व्यक्तींनीआरोप करावेत हे दुर्दैवी आहे. चर्चला मोठ्या प्रमाणात पैसे प्राप्त होतात आणि त्याचे धर्मांतर केले जाते त्याला पैसे,नोकरी, घरदार दिले जाते असा अपप्रचार काही राजकीय पक्ष व त्यांच्या संघटना वारंवार करत आल्या आहेत मात्र यात काहीही सत्य नाही. वर्षानुवर्षे चालवीत आणलेला खोटा प्रचार बहुतांश लोकांच्या डोक्यात उतरविण्यात ते यशस्वी झालेआहेत.
लोकांवर अत्याचार आणि मिशनरीची स्थापना / महान व्यक्ती मिशनरीच्या संपर्कात मात्र धर्म परिवर्तन नाही… वास्तविक पहाता लोकांवर होत असलेल्या अत्याचारांमुळेच पंडिता रमाबाई यांनी मुक्ती मिशनची स्थापना सन १ फेब्रुवारी १८८९ मध्ये केली होती. आज जवळ जवळ १३५ वर्षे या संस्थेस झाली आहेत. संस्थेने अनेक विधवा, अनाथ मुला-मुलींचे संगोपन करून आयुष्य घडविले आहे. पुण्यात कर्वे रस्ता ज्यांच्या नावाने आहे व कर्वे शिक्षण संस्था ज्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरु केली त्यांनी मुक्ती मिशनमधील आनंदीबाई जोशी यांच्याशी विवाह केला अशी असंख्य उदाहरणे आपणास पहावयास मिळतील. आनंदीबाई शारदा सदन या पंडितारमाबाई यांच्या संस्थेमध्ये अनेक वर्षे राहिल्या, आनंदीबाई स्वतः विधवा होत्या, त्यांना रमाबाई यांनी प्रेमाने सांभाळले, शिक्षण दिले पुढे त्यांचा महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी विवाह देखील करुन दिला. रमाबाई यांनी स्वत: स्विकारलेला धर्म त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न केला नाही तसेच त्यांच्या समकालीन दुर्गाताई किर्लोस्कर, काशीबाई देवधर, वेणुताई नामजोशी याही शारदा सदनात होत्या. या तिघीही पुढे अनाथ बाल आश्रम संस्थेत हिंगणे येथे काम करण्यास आल्या. त्यांना देखील मुक्ती मिशनबाबत कधीही धर्मांतर केलेचे दिसले नाही. या वरून आपण समजू शकतो की, मुक्ती मिशनमध्ये जाती धर्माच्या पुढे जावून समतेची बीज रुजवली गेली होती आणि पंडिता रमाबाई यांचा हाच आदर्श व उच्चमुल्यघेवून ही संस्था आजही प्रामाणिकपणे रमाबाई यांचा वारसा चालवत आहे.
आरोप चुकीचा आणि खोटा ख्रिस्ता धर्माबद्दल केला जाणारा आक्षेप म्हणजे बाप्तीस्मा व चर्च मध्ये दिली जाणारी वाईन याद्वारे केले जाणारेधर्म परिवर्तन या दोन्ही बाबीचा वापर अतिशय चुकीच्या पध्दतीने काही राजकीय पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी करीतआहेत. चर्च मध्ये दिली जाणारी वाईन व ब्रेड यामुळे कोणी ख्रिश्चन होऊ शकत नाही असे या निवेदनात म्हटले असून केवळ आपला राजकीय अजेंडा चालवीण्यासाठी असले बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे यात म्हटले आहे. तसेच रमाबाई मुक्तीमिशन ला बदनाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असेही शेवटी या निवेदनात म्हटले आहे.