फुटून बाहेर पडलेल्यांना मोठी किंमत मोजावी लागेल | शरद पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दिल्लीत ठराव ! 2 खासदार, 9 आमदारांच्या निलंबनाची घोषणा

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आज 8 ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्यातून भाजपला सपोर्ट करणाऱ्या 2 खासदार आणि 9 आमदारांचे निलंबन करण्यात आल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. आणि कुणी जर राष्ट्रवादी अध्यक्ष असल्याचा दावा करत असेल तर त्याला काही अर्थ नाही असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच आपला निवडणूक आयोगाकडे जाण्याचा विचार असून आपल्याला निवडणूक आयोगावर संपूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवारांनी जी टीका केली त्याला उत्तर देताना कुणाला किती समर्थन आहे हे वेळ आल्यावर कळेल असे उत्तर त्यांनी दिले आहे. इतरांनी जी नियुक्तीचा दावा केला आहे त्याला काही महत्व नाही, आम्ही आमचा पक्ष मजबुतीने पुढे नेणार आहे त्यामुळे लवकरच कुणाकडे किती संख्याबळ आहे हेही कळेल असे त्यांनी म्हटले आहे.

सध्या देशात ईडी, सीबीआय चा वापर करून लोकांना आपल्याकडे घेतले जात आहे यावरही पवार यांनी भाष्य केले आहे. तसेच मी 92 वर्षांपर्यंत लढू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे. तर दिल्ली येथे होणाऱ्या शरद पवारांच्या बैठकीवर अजित पवार गटाने बैठक घेण्यावर हरकत नोंदवली आहे.