बादशाह शेख यांच्या नातलगांना मारहाण करणाऱ्या लोकांवर कधी गुन्हे दाखल होणार! दौंड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणाऱ्या संतप्त महिलांचा सवाल

अख्तर काझी

दौंड : शहरातील कुंभार गल्ली येथील दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात दौंड पोलिसांनी माजी नगराध्यक्ष बादशाह शेख सह 15 ते 20 जणांवर ॲट्रॉसिटी आणि अन्य गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात बादशाह शेख व इतर 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र विरोधी गटातील लोकांवर अजून गुन्हे दाखल करण्यात आले नसल्यामुळे येथील महिलांनी दौंड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढीत या हाणामारी घटनेत बादशाह शेख यांच्या नातलगांना मारहाण करणाऱ्या व महिलेचा विनयभंग करणाऱ्या लोकांवर कधी गुन्हे दाखल होणार असा सवाल उपस्थित केला असून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशा मागणीचे निवेदन दौंड पोलिसांना देण्यात आले आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई न झाल्यास दौंड पोलीस स्टेशनवर पुन्हा मोर्चा काढण्याचा इशारा या मोर्चातील महिलांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. 20 ऑक्टोबर रोजी कुंभारगल्ली येथे दोन गटांत हाणामारीची घटना घडली होती. दि.9 नोव्हेंबर रोजी बादशाह शेख व इतरांविरोधात दौंड पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे बादशहा शेख यांनी बारामती जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. सुनावणी नंतर मात्र दिनांक 23 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला. तेव्हापासून ते फरार होते. दि.29 नोव्हेंबर रोजी बादशाह शेख यांना राजस्थानातील अजमेर येथे पुणे जिल्हा ग्रामीण विभागाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून अटक करण्यात आली. त्यामुळे दौंड शहरातील हिंदू मुस्लिम समाजातील महिलांनी बादशहा शेख यांच्या समर्थनार्थ दौंड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला आणि या हाणामारी प्रकरणातील विरोधी गटातील लोकांवर कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी केली.

यावेळी संशईत व्यक्तींच्या विरोधात तक्रार अर्ज देण्यात आला. या तक्रार अर्जात असे नमूद करण्यात आले आहे की, 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वा.च्या सुमारास पीडित महिला किराणा आणण्यासाठी जात असताना वरील नमूद केलेल्या व्यक्ती घोळका करून हातामध्ये तलवार, काठ्या, गज, चाकू अशी हत्यारे घेऊन समाजाच्या नावाने शिवीगाळ करीत होते. यापैकी एकाने त्या महिलेचा विनयभंग केला, मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सर्वांनी पिडीतेला उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे घाबरून ती घराकडे पळाली व तीने आपल्या पतीला घडलेली हकीकत सांगितली. दरम्यान ही सर्व लोक तिच्या घरात घुसली व आपल्याकडील तलवार, चाकू या हत्यारांनी त्यांनी तिच्या पतीला मारहाण करीत जखमी केले. भांडणाचा आवाज ऐकून त्या ठिकाणी आलेल्या पीडितेच्या चुलत दिरालाही या लोकांनी जबर मारहाण करीत जखमी केले. पीडित महिलेला सुद्धा मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ही हिसकावून नेत तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी दमबाजी सुद्धा करण्यात आल्याची तक्रार पीडित महिलेने दौंड पोलिसांकडे केली आहे.