दौंड : दौंड-कुरकुंभ महामार्गावरच्या बोरावके नगर हद्दीतील जिजामाता नगर परिसरातील कचराकुंडीमध्ये मृत अर्भक व मानवी शरीराचे अवशेष असलेल्या बरण्या सापडल्याची संताप जनक घटना समोर आली होती. आता बरण्या शहरातीलच एका खाजगी दवाखान्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे शहरात या दवाखान्याच्या गलथान कारभाराविषयी मोठा संताप व्यक्त केला जात आहे. आता पोलीस या दवाखान्याविरोधात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दौंड परिसरात कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला हे मृत अर्भक आणि मानवी अवयव असलेल्या बरण्या कचराकुंडीत आढळून आल्या होत्या. त्याने सदर घटनेची माहिती दौंड पोलिसांना दिली दिल्यानंतर दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये असणारे मृत अर्भक व मानवी अवशेष ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने स्वतः फिर्यादी होत तक्रार दाखल केली.
दि.25 मार्च रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मानवी सदृश्य अर्भक व मानवी अवशेष गर्भस्त्राव घडवून ती उघड्यावर टाकून दिले असल्याचे फिर्यादीत नमूद करीत दौंड पोलिसांनी तपास सुरू केला. मृत अर्भक व मानवी अवशेष वेगवेगळ्या बरण्यांमध्ये होते. त्या बरण्यांमध्ये काय आहे याचा उल्लेख (तारखेसहित) बरण्यांवर केलेला होता. त्या द्वारे तपास केला असता, या सर्व बरण्या शहरातीलच एका खाजगी दवाखान्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या खाजगी दवाखान्याच्या डॉक्टर मालकांना पोलीस स्टेशनला बोलावून चौकशी केली असता मृत अर्भक, मानवी अवशेष असलेल्या बरण्या त्यांच्याच दवाखान्यातील असल्याचे त्यांनी मान्य केले.
शहरातील दवाखान्यांमधून जैव वैद्यकीय कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याने या खाजगी दवाखान्यातून मृत अर्भक व अवशेषाच्या बरण्या घेऊन त्या जिजामाता नगर परिसरातील कचराकुंडीत टाकले असल्याचे पोलिसांनी सांगितले. जैव वैद्यकीय कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व खाजगी दवाखान्याने केलेल्या या प्रतापाचा सर्व स्तरातून निषेध व संताप व्यक्त केला जात आहे. मृत अर्भक व मानवी अवशेष यांची विल्हेवाट दवाखान्यानेच लावणे गरजेचे असताना त्यांनी ते या जैव वैद्यकीय कचरा गोळा करणाऱ्यांकडे दिलेच कसे हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.
या संताप जनक कृत्याला खाजगी दवाखान्यातील डॉक्टर व जैव वैद्यकीय कचरा गोळा करणारा तितकेच जबाबदार आहेत. या घटनेमध्ये खाजगी दवाखान्याने बेजबाबदारपणा दाखविला असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस प्रशासन नेमके कोणा विरोधात कारवाई करणार असा प्रश्न सर्वच स्तरातून उपस्थित केला जात असून बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.