दौंड | यंदाची शासकीय शिवजयंती मोठ्या जल्लोषात… अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम, स्पर्धांचे आयोजन

दौंड : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने यंदाच्या शासकीय शिवजयंती (19 फेब्रुवारी) निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दौंड शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींनी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे ठरविले आहे.

शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने युवा पिढीला शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाची माहिती मिळावी या उद्देशाने दि.17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान दौंड शहर व तालुका मराठा महासंघाच्या वतीने अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आली आहे. दि. 17 फेब्रुवारी रोजी येथील सरपंचवस्ती येथून शिवकालीन दवंडीचा आरंभ करण्यात येणार आहे. दि.18 फेब्रुवारी रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये (सायंकाळी 7 वा.) आचार्य शाहीर हेमंतराज मावळे यांचा शाहिरी रचना व पोवाडा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी भारत स्वाभिमान ट्रस्ट च्या वतीने शिवाजी चौकामध्ये सकाळी 6.30 वा. महिलांचे सामूहिक श्री गणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 8 वा. शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे ( वयोगट,14 वर्षाखालील मुले ,मुली) आयोजन करण्यात आले आहे.( संपर्क- प्रताप खानविलकर 8087914852/ राहुल पवार-9146165143) तसेच दुपारी 12 वा. शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात या अंतर्गत घरोघरी शिवजयंती सजावट स्पर्धा (दौंड शहर मर्यादित) होणार आहे. ( संपर्क- वैभव पाटील 9960406467). दु.4 वा. चित्ररथ व जिवंत देखावा स्पर्धा आणि पालखी सोहळा पार पडणार आहे.

नवीन तहसील कार्यालयापासून पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सांगता करण्यात येणार आहे. रात्री 8 वा. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सर्व शिवप्रेमींनी शिवजयंती उत्सवामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.