‛हा’ आहे सुपे (बारामती) येथील ‛शाहमन्सूर दर्गाह’ चा खरा वाद ! वक्फ न्यायाधिकरणचा नेमका काय आहे ‛हुकूम’ आणि ‛उभयतांचे’ म्हणणे वाचा सविस्तर

सहकारनामा ब्युरो

पुणे : सुपे येथील हजरत ख्वाजा शाहमन्सूर आरीफ बिल्लाह रह.अलैह दर्गाहचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दर्गाह चे ट्रस्टी आणि दर्गाह चे पारंपारिक मुजावर यांच्यामध्ये सध्या हा वाद पेटल्याचे दिसत असून दर्गाह चा उरूस काही दिवसांवर येऊन ठेपला असताना दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होत असल्याने येथील वातावरण तप्त झाले आहे.

याबाबत येथील चीफ ट्रस्टी युनूस कोतवाल यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना दि.15 मे 2023 रोजी औरंगाबाद वक्फ बोर्ड ट्रिब्युनलने एक हुकूम दिला असून यामध्ये सदर दर्गाह च्या जागेमध्ये कुठलेही अतिक्रमण अथवा बांधकाम करण्यास मनाई केली असल्याचे म्हटले आहे. मात्र या जागेत काहींनी अतिक्रमण केले असून ते काढण्याची मागणी आम्ही करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

तर याबाबत येथील दर्गाह चे मुजावर (पुजारी) दिलावर काझी यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना, आम्ही सुपे (ता.बारामती) येथील हजरत शाहमन्सूर दर्गाह चे पिढीजात पुजारी आहोत. आमचे पूर्वज येथील दर्ग्याची पिढीजात पूजा करत आले आहेत. मात्र काही व्यक्ती दर्ग्याच्या चीफ ट्रस्टी नसताना आपण चीफ ट्रस्टी असल्याचे भासवून फसवणूक करत असून ते जर चीफ ट्रस्टी असतील तर त्यांनी तसा आदेश दाखवावा असे म्हटले आहे. तसेच आपन वक्फ ट्रिब्युनल च्या हुकुमाचा आदर करतो त्यामुळे त्यांचा हुकूम आल्यापासून आपण येथे कुठलेही अतिक्रमण अथवा बांधकाम केले नाही व भविष्यातही करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र ट्रस्टी असल्याचा दावा करणाऱ्यांकडून व त्यांच्या साथीदारांकडून आपल्या जीवाला धोका असल्याने आपण पोलिसांत तक्रारी अर्ज दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आपल्याकडे एक पत्र असून या पत्राला स्वतः ती व्यक्ती अर्जदार आहेत त्या पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की सदर व्यक्ती ही हजरत शाहमन्सूर आरीफ बिल्लाह रहे. वक्फ संस्थाचे ट्रस्टी असल्याबाबत कार्यालयाचे कुठलेही आदेश नसून त्याबाबत वक्फ मंडळात दोन चेंज रिपोर्ट केस दाखल आहेत. त्यात त्यांचे नाव सामील आहे मात्र अजून ते दोन्ही चेंज रिपोर्ट सुनावणीत प्रलंबित असून त्यावर कोणतेही निर्णय अद्याप झाले नाहीत. त्यामुळे सदर व्यक्ती ट्रस्टी नसतानाही ट्रस्टी असल्याचे सांगून जनतेची मोठी फसवणूक करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत युनूस कोतवाल यांनी माहिती देताना, जे पत्र दाखवले जात आहे ते आमचेच असून त्याला अर्जदार आम्ही आहोत. ज्यावेळी आमची केस ट्रिब्युनल मध्ये होती व त्याचा 15 मे ला जो निकाल लागला त्यावेळी सदर व्यक्तीने वरील बाब त्यात नमूद का केली नाही. तसेच वक्फ बोर्ड ठरवत नाही आम्ही कोण आहोत. ते तर आम्ही मिटिंग घेऊन ठरवतो की आम्ही कोण आहोत आणि तसा ठराव त्यांना पाठवला जातो असे त्यांनी म्हटले आहे. आणि आम्ही कोण आहोत म्हणून तर वक्फ बोर्ड ट्रिब्युनल औरंगाबाद कडून तो निकाल दिला गेला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. आणि सदर प्रॉपर्टी ही वक्फ प्रॉपर्टी असून सदर व्यक्तीचा त्यामध्ये काही करण्याचा अधिकार नाही असे शेवटी त्यांनी म्हटले आहे.

याबाबत काझी यांचे वकील अ‍ॅड.मुजाहिद शेख, अ‍ॅड.मुजतबा शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात समोरील व्यक्तींनी महाराष्ट्र स्टेट वक्फ न्यायाधिकरण मध्ये दर्गाह च्या जागेच्या ताब्याचा दावा केला होता व त्यात अतिक्रमण करत असल्याचे म्हटले होते. मात्र आमचा युक्तिवाद सुरू होण्याअगोदर कोर्टानेच वकिलांच्या अतिक्रमण या विषयावर भाष्य करताना जी दर्गाह ची साधारण 3 हेक्टर च्या आसपास जी जागा त्यांच्या ताब्यात आहे तिच्यावर त्यांनी अतिक्रमण केले असे कसे म्हणता येईल असे म्हटले असल्याचे ऍड.मुजाहिद शेख यांनी सांगितले. तसेच कोर्टमध्ये जो युक्तिवाद झाला त्यामध्ये,दर्गाह मध्ये जी चंदा पेटी आहे ती त्यांनी (काझी यांनी) तेथे ठेऊ नये, चंदा घेऊ नये अशी मागणी समोरील व्यक्तींकडून करण्यात आली होती. मात्र ही मागणी ट्रिब्युनल ने फेटाळली असल्याचे अ‍ॅड.मुजाहिद शेख यांनी यावेळी सांगितले.

तसेच संबंधित दर्गाहची जमीन दिलावर काझी आणि त्यांच्या भावाच्या ताब्यात असून ती जमीन त्यांना पिढ्यानपिढ्या वारसाने आली आहे. ही जमीन आदिलशाह बादशहाने काझी यांच्या पूर्वजांना दिली आहे. त्याची सनद आणि इतर कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. समोरील व्यक्तींनी असा दावा केला होता की दर्गाह ची जमिन हे लोक विकत आहेत त्यामुळे त्यांनी ती जमिन विकू नये, यावर कोणते बांधकाम करू नये तसेच ती जमिन तिसऱ्या व्यक्तीला देऊ नये. यावर दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. यावेळी कोर्टने काझी यांच्या वकिलांना प्रश्न केले की तुम्ही प्रॉपर्टी विकत आहात का त्यावेळी काझी यांच्यावतीने अ‍ॅडव्होकेट मुजाहिद शेख व इतर यांनी बाजू मांडताना ही प्रॉपर्टी दर्गाह ची आहे, वक्फची आहे हे आम्हाला (काझी यांना) माहीत आहे. त्यामुळे ती विकण्याचा आम्हाला अधिकार नाही व ती आम्ही कुणाला विकतही नाही आणि विकलिही नाही असे सांगितले. तसेच आम्ही पिढ्यानपिढ्या दर्गाह चे खादीम आहोत. आदिलशहा बादशहाने या दर्गाह च्या खिदमत साठी आम्हाला ही प्रॉपर्टी दिली असून ती आजही आमच्या ताब्यात आहे. मात्र ती प्रॉपर्टी आम्ही विकणार नाही आणि या अगोदरही आम्ही ही प्रॉपर्टी कुणाला विकलेली नाही आणि जर तसे काही करार असतील तर समोर आणावेत असा युक्तिवाद केला. तसेच बांधकामाचा जो विषय आहे ते तर अगोदर झालेले आहे. ती प्रॉपर्टी शेतीझोन असल्यामुळे यापुढे त्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही बांधकाम करणार नाही असा आम्ही भरवसा दिला असल्याचे काझी यांच्या वकिलांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट वक्फ न्यायाधिकरण ने दिलेल्या हुकूमानुसार यात कुठेही त्यांनी शेती करू नये, अथवा त्यात पीक काढू नये असे म्हटलेले नाही. त्यामुळे काझी त्या शेतजमिनीत शेती करू शकतात, पिके घेऊ शकतात मात्र ती शेती विकू शकत नाही अशी माहिती काझी यांचे वकील अ‍ॅडव्होकेट शेख मुजाहिद यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना दिली.