मागील वेळेपेक्षा ‘राहुल कुल’ यांना ही निवडणूक सोपी जाणार ! राष्ट्रवादी ‘अजित पवार’ गटामुळे मताधिक्यात आणखी वाढ होणार

दौंड (राजकीय वार्तापत्र – अब्बास शेख) : दौंड तालुका विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विरधवल जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु महायुतीचा धर्म पाळून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे मागील वेळेपेक्षा ‘राहुल कुल’ यांना ही निवडणूक सोपी जाणार अशी परिस्थिती सध्या तयार झाली असून राष्ट्रवादी ‘अजित पवार’ गटामुळे तर त्यांचे मताधिक्य आणखी वाढणार असे काहीसे चित्र दिसत आहे.

मागील वेळेस राष्ट्रवादी चे उमेदवार रमेश थोरात यांसोबत जेष्ठ नेते शरद पवार, खा.सुप्रिया सुळे, अजितदादा पवार, विरधवल जगदाळे, वैशालीताई नागवडे, विकास आबा ताकवणे, बादशहा शेख,गुरमुख नारंग, नितिन दोरगे, सोहेल खान,  यांसह आत्ता असणारी सर्वच दिग्गज मंडळी उभी होती. त्यावेळी कळीचा मुद्दा ठरला होता बंद पडलेला भीमा पाटस कारखाना. कारखाना बंद असल्याने उस उत्पादक शेतकरी, कामगार नाराज होते मात्र असे असतानाही राहुल कुल हे अल्प मताधिक्याने का होईना विजयी झाले होते. आता तर परिस्थिती बदलली आहे. आता भीमा पाटस कारखाना सुरु झाला असून त्यामुळे उस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कामगारांमध्ये सुद्धा आनंदी वातावरण आहे.

मागील वेळेस मतांचे बलाबल जवळपास सारखे राहिले होते. परंतु या वेळेस युतीचा धर्म पाळून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विरधवल जगदाळे, वैशालीताई नागवडे, विकास आबा ताकवणे, गुरमुख नारंग, नितीन दोरगे यांसह अजितदादा गटाचे तालुक्यातील कार्यकर्ते आमदार राहुल कुल यांचे ठाम पणाने काम करणार असल्याने आमदार राहुल कुल यांना त्याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे राहुल कुल यांच्या मताधिक्यात वाढ होणार असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

गेल्या दहा वर्षात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यात जी विकास झाली. आरोग्य निधीच्या माध्यमातून जी मदत करण्यात आली. त्याचा मोठा फायदा देखील त्यांना होताना दिसत आहे. तसेच कोरोना काळात ज्या लोकांना सहकार्य झाले ते सहकार्य लोक विसरलेले नाहित त्यामुळे राहुल कुल हे चांगल्या मताधिक्याने दौंड मध्ये निवडून येतील असा विश्वास त्यांचे सहकारी, कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.