धरणग्रस्त, अल्पभूधारक, भूमिहीन शेतकऱ्यांच्या जमिनीवरील ‛हा’ शेरा दूर होणार ! ‛आमदार राहुल कुल’ यांच्या मागणीला ‛वन मंत्र्यांचा’ सकारात्मक प्रतिसाद

अब्बास शेख

स्वतःची जमीन आहे पण मालकी नाही, म्हणजेच गाडी माझीच आहे पण माझ्या नावावर नाही अशी काहीशी परिस्थिती सन १९८० पूर्वीच्या विविध सिंचन प्रकल्पांचे प्रकल्पग्रस्त, ग्रोमोअर योजना, भूमिहीन तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांची आहे. कारण त्यांच्या उपजिविकेसाठी शासनाद्वारे वाटप करण्यात आलेल्या जमिनींवर फॉरेस्ट हा शेरा आहे. हा शेरा काढण्यासाठी त्या जमिनीचे निर्वनीकरण आवश्यक असते. नेमका याच मुद्द्याला दौंडचे आमदार राहुल कुल यांनी हात घातला.

वनविभागाचा फॉरेस्ट शेरा असलेल्या जमिनिचे निर्वनीकरण करावे याबाबत आमदार राहुल कुल हे सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत, मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात याप्रश्नी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन माननीय वन मंत्री महोदयांनी आमदार कुल आणि उपस्थित सभागृहाला दिले होते. तद्नुसार आज राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली निर्वनीकरणाबाबत बैठक पार पडली.

यावेळी पुनर्वसन तसेच शासनाच्या विविध योजना, भूमिहीन व अल्प भूधारक शेतकरी आदींसाठी शासकीय जमिनींचे वाटप करण्यात आले परंतु त्याचे निर्वनीकरण केले नसल्याने या शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या वन जमिनींचे निर्वनीकरण करावे, शेतकऱ्यांना व सार्वजनिक स्वरूपाच्या योजनांच्या पाईप लाईनसाठी वन विभागाने परवानगी द्यावी अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली.

तसेच ग्रामीण भागात बिबट्याचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय असून त्याबद्दल वनविभागाने आवश्य उपाय योजना कराव्यात आदी मागण्याही यावेळी त्यांनी केल्या. यावेळी निर्वनीकरणाबाबत सकारात्मक निर्णय व आपल्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार राहुल कुल यांना दिले.