दौंड | चोरट्यांनी दोघांना मारहाण करीत बंगल्यातील 7 लाख 66 हजारांचा ऐवज लुटला

अख्तर काझी

दौंड शहर : शहरातील सहकार चौक ते गोल राऊंड रस्त्यावर असणाऱ्या एका बंगल्यात चार अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करीत बंगल्यात रहात असणाऱ्या दोघांना दमदाटी व मारहाण करीत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 7 लाख 66 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अशोक बेनिप्रसाद अग्रवाल (वय 74, अग्रवाल बंगला ,सहकार चौक दौंड) यांनी फिर्याद दिली असून दौंड पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.2 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी अग्रवाल बंगल्याची कौले काढून बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यात असलेले फिर्यादी व त्यांचा वाहन चालक अनिल शिरसाठ याला चोरट्यांनी पाईप व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील सोन्याचे दागिने काढून घेतले. नंतर या चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून त्यातील 4 लाख 40 हजार रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने, एक मोबाईल असा एकूण 7 लाख 66 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला.

सहकार चौक ते गोल राऊंड या रस्त्यावर स्ट्रीट लाईट नसल्याने व रस्त्याच्या दुतर्फा मोठी झाडी वाढल्याने या ठिकाणी मोठा अंधार असतो तसेच रात्रीच्या वेळेस वर्दळ ही कमीच असते. या परिस्थितीचा चोरट्यांनी फायदा उचलत आपला डाव साधला असल्याचे बोलले जात आहे. घरफोडी करताना चोरट्यांनी घरातील दोघांना मारहाण केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. या रस्त्यावर दुतर्फा असणाऱ्या झाडीमुळे छोटे मोठे अपघातही होत आहेत त्यामुळे ही झाडी काढावी तसेच या परिसरामध्ये स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.